आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत यापुढे लोकशाही बंद;उद्धव ठाकरे यांचा निर्धार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते, ‘तू पक्षात जास्त लोकशाही आणतोयस, हे योग्य नाही. मी सर्वांना सैनिकी शिस्तीत ठेवले आहे. त्यांना तसेच राहू दे.’ त्यांचे म्हणणे अगदी बरोबर होते. त्यामुळे यापुढे मी पक्षातील लोकशाही बंद करतोय, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी स्पष्ट केले.

मराठवाड्यातील पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. लोकशाही बंद करतोय, असे म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर उद्धव म्हणाले, हा प्रतिसाद पाहून तुमचा माझ्यावर विश्वास असल्याचे दिसते. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यामुळे यापुढे मार्गदर्शन नाही. फक्त काम करायचे आणि जिंकायचेच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रामा इंटरनॅशनलमध्ये झालेल्या या मेळाव्यातील 30 मिनिटांच्या भाषणात उद्धव म्हणाले, माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारातून शिवसेनेचा जन्म झाला. बाळासाहेबांनी ती दोन पावले पुढे नेली आणि आता मला ती आणखी एक पाऊल पुढे न्यायची आहे. मोदी लाटेमुळे चांगले वातावरण आहे म्हणून निर्धास्त राहू नका, असे ते म्हणाले. लोकसभेत राज्यातील 22 जागा जिंकण्याचे ध्येय त्यांनी स्पष्ट केले.

रस्त्यांचा धसका; ‘रामा’तूनच परत : ठाकरे यांचा दौरा अवघा एक तास 48 मिनिटांचा राहिला. ठाकरे येणार म्हणून खासदार चंद्रकांत खैरे यांनी सिद्धार्थ उद्यानात जाऊन मुक्तिसंग्राम संग्रहालयाच्या कामाची पाहणी केली. ठाकरे कदाचित सलीम अली सरोवर किंवा अन्य ठिकाणीही भेट देण्याची शक्यता असल्यामुळे अनेक ठिकाणी साफसफाई करण्यात आली होती. ते जाण्याची शक्यता असलेल्या रस्त्यांवरील खड्डेही बुजवण्यात आले होते; परंतु ठाकरे यांनी पाठ फिरवली. शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेचा धसका घेऊन त्यांनी पाहणी करणे टाळल्याची चर्चा होती.

काँग्रेस म्हणजे मेलेली पाल
काँग्रेसची परिस्थिती मेलेल्या पालीसारखी असल्याचे उद्धव यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले, पालीचा जीव गेला तरी शेपूट वळवळत राहते. तशी काँग्रेसची वळवळ सुरू आहे. त्यांना संपवायचे असेल तर आपल्याला निष्ठेने काम करावे लागेल.

पेपरवाल्यांशी बोलू नका
या वेळी बोलताना खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांपासून दूर राहण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. पेपरवाले काहीही छापतात, त्यांना काहीही सांगू नका, त्यांच्यापासून कायम दूर राहा. पालिकेतील काही कार्यकर्ते मुद्दाम पत्रकारांना बातम्या देतात, असा आरोपही त्यांनी केला.