आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता द्या, प्रगतीचे रंग भरतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मी चित्रकार आहे. आधी आऊटलाइन तयार करतो, नंतर रंग भरतो. तुम्ही मला सत्ता द्या, प्रगत महाराष्ट्राचे चित्र मी भरेन, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत सांगितले. दहा वर्षांपासून चर्चेत असलेली समांतर पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन ठाकरे यांनी केले त्या वेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, राजकुमार धूत, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, युतीचे स्थानिक आमदार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महापौर कला ओझा होत्या. सिद्धार्थ उद्यानाच्या हिरवळीवर हा कार्यक्रम झाला.

अलीकडच्या काळात पर्यटन हे सामान्यांच्या आवाक्यात आले आहे. अनेक जण विदेशात जाण्याचे नियोजन करतात. त्याचप्रमाणे आपल्या शहरात येण्याचे नियोजन विदेशातील मंडळींनी का करू नये, असा प्रश्न मला पडला होता. केवळ इमारती बांधणे म्हणजे विकास नव्हे. येथील सर्व पर्यटनस्थळे अप्रतिम आहेत, परंतु सुविधांचा अभाव आहे. त्यामुळेच या शहराला सर्व सुविधांनी युक्त पर्यटन हब करण्याचा निर्णय मी घेतला आहे. सत्ता येताच अडीच वर्षांत येथील चित्र बदललेले असेल असा दावा त्यांनी केला. समांतर तसेच भूमिगत गटार योजना म्हणजे भविष्यातील विकासाची नांदी असल्याचे सांगतानाच निवडणुकीच्या आधी भूमिपूजन झाले म्हणून यावर टीकाही होऊ शकते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

मी १२ छिद्रांचा पाना, मला टाळू नका : प्रत्येक योजना मीच आणली असे खैरे नेहमी सांगत असतात. दानवे केंद्रात मंत्री झाले तरी खैरे त्यांना सोबत घेत नाहीत, यावर दानवे यांनी खैरेंना शालीतून जोडे लगावले. मी आता केंद्रात मंत्री आहे. माझे खाते कोणते आहे यावर जाऊ नका. प्रत्येक खात्याच्या मंत्र्याशी संबंध येतो. तू माझे कर मी तुझे करतो, असे तेथे चालते. खाते कोणतेही असो, काही फरक पडत नाही. पूर्वी सायकलीसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ छिद्रांच्या एकाच पान्याप्रमाणे मी आहे. अख्खी सायकल एकाच पान्याने खोलता व जोडता येते. तुम्ही मलाही सोबत घ्या, आपण आयआयएम येथे आणू, रस्त्यांसाठी ६२३ कोटी रुपयांचा पालिकेने दिलेला प्रस्तावही मंजूर करून घेऊ. सर्व मिळून प्रयत्न करू, तुम्ही एकटेच का बरे पळता, असा सवालही त्यांनी केला. येत्या वर्षभरात औरंगाबाद विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतील यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रात यूपीएचे सरकार व विरोधात असतानाही मी शहरासाठी १२०० कोटींच्या योजना आणल्या. आता तर माझेच सरकार आहे. तेव्हा येत्या पाच वर्षांत शहराचा कायापालट करून दाखवीन, असा दावा खैरे यांनी केला. लवकरच केंद्रीय पर्यटनमंत्रीही शहरात येतील, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

वाद विसरून उदो-उदो
गेल्या काही महिन्यांपासून खैरे आणि पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे या दोघांतून विस्तवही जात नव्हता. या दोन्हीही योजनांवरून दोघांत जाहीर खटके उडाले आहेत. मात्र आजच्या कार्यक्रमात वेगळेच चित्र दिसले. प्रारंभी प्रास्ताविकात डॉ. कांबळे यांनी खैरे यांच्या कार्यशैलीचे तोंडभरून कौतुक केले, तर नंतर खैरे यांनी आपल्या भाषणात डॉ. हर्षदीप कांबळे आदर्श आयुक्त असल्याचे सांगितले. दोघांच्याही या वक्तव्यावर उपस्थितांचा लवकर विश्वास बसला नाही.