सिल्लोड - युतीसंदर्भात बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांच्यात झालेला करार मान्य करण्यास उद्धव ठाकरे तयार नसल्याने युती तुटल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी सिल्लोड येथे बोलताना सांगितले.भाजपचे उमेदवार सुरेश पाटील बनकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
दानवे पुढे म्हणाले की, युती तुटल्याचा सर्वांनाच धक्का बसला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत एकत्रित निवडणुका लढवल्या जातील, अशी आशा होती. सुरुवातीला युती करताना ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असा करार करण्यात आला.
१९९५ ला युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनेच्या मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले. त्यानंतर भाजपचे जास्त आमदार निवडून आले, परंतु सरकार येऊ शकले नाही. हाच निकष कायम ठेवण्याचा भाजपचा आग्रह होता, परंतु उद्धव ठाकरेंना तो मान्य नसल्याने युती तुटल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आजचा मतदार कोणत्याही प्रसिद्धीने फारसा प्रभावित होत नाही. त्यामुळे चर्चेतून विचार मांडल्यास चांगला प्रचार होऊ शकतो, असेही दानवे यांनी सांगितले.