आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी मार्गाला शिवसेनेचा विरोधच; सोन्यासारखी जमीन काढून रस्त्यावर आणणे विकास नव्हे- उद्धव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शेतकऱ्यांची सोन्यासारखी जमीन काढून त्यांना रस्त्यावर आणणे हा विकास नाही, असे ठणकावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध केला. पत्रकार परिषदेत शिवसेनेची समृद्धी मार्गाबाबतची भूमिका विशद करण्याआधी त्यांनी समृद्धी मार्गामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ‘तुम्ही ठाम राहणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी लढू’ अशी ग्वाहीही दिली.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांचे अहवाल रविवारी उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आले. यानंतर एका पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाला मुंबई परिसर व नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या विरोधापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातही विरोध होत आहे. या विषयावर ठाकरे म्हणाले की, कुणाचा सत्यानाश करून होणारा विकास आम्हाला नको आहे. समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना काही मदत करीत नाही. जे शेतकरी आपल्या शेतीतून कमावतात त्यांच्याच सुपीक जमिनी आता घेतल्या जात आहेत. हा महामार्ग थोडा इकडे तिकडे केला तरी या सुपीक जमिनी वाचतील. शेतकऱ्यांकडची सोन्यासारखी जमीन काढून त्यांना रस्त्यावर आणणे हा विकास नाही, असेही त्यांनी ठणकावले. 

हा महामार्ग विदर्भात जाणारा असून सगळे विकास प्रकल्प विदर्भात जात आहेत, अशा टिप्पणीवर ठाकरे म्हणाले की, विदर्भही माझाच आहे. त्यांचाही विकास व्हायला हवा; पण शेतकऱ्याला मारून वेडावाकडा विकास करू नका असेही ते म्हणाले.

कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी
कर्जमाफीच्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचे सांगत त्यांनी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आतापर्यंत सत्तेत असताना काहीही न केलेले विरोधकही पुढे आल्याचा टाेला लावत स्वागतही केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आम्ही कर्जमुक्तीच्या दिशेने काम करत आहोत, असे सांगितले. त्याला आता महिना उलटून गेला आहे. पेरण्यांचा हंगाम जवळ आला आहे. आधीचे कर्ज नावावर असेल तर शेतकऱ्यांना कर्ज मिळणार कसे, असा सवाल त्यांनी केला. या प्रश्नावर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का असे विचारले असता ठाकरे म्हणाले की, आम्ही सत्तेत आहोत. तिथे राहून न्याय मिळवून देण्याचे  सगळे प्रयत्न करीत आहोत. 

अन्नदात्याचा अंत पाहू नका
अन्नदात्याचा अंत कुणी पाहू नये. मागेल त्याला कर्ज मिळेल असे सांगितले जाते. परंतु जुने कर्ज माफ झाल्याशिवाय कुणी कर्ज देत नाही. मराठवाड्यात २१ लाख लोकांना कर्ज मिळू शकलेले नाही. तुरीचाही प्रश्न गंभीर आहे. मागच्या वर्षी तुरीचे संकट आल्यावर सरकारनेच तुरीची लागवड करा, असे आवाहन केले होते. यंदा तूर जास्त असेल हे सप्टेंबरमध्येच समजले असताना काय नियोजन केले, असा प्रश्नही त्यांनी विचारला. जाे शेतकरी तुमच्या शब्दावर विसंबून तूर उत्पादन करतो त्याचा शेवटचा दाणा जाईपर्यंत खरेदी केंद्र सुरू राहिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

शिवसेनेचे अभियान
कुठल्याही परिस्थितीत कर्जमुक्ती झालीच पाहिजे असे सांगत ठाकरे यांनी शिवसेना शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी लवकरच ‘मी कर्जमुक्त होणारच’ ही योजना अमलात आणणार असल्याचे जाहीर केले. याचा तपशील लवकरच जाहीर करू, असे ते म्हणाले.
 
बातम्या आणखी आहेत...