आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे अध्यक्ष झाल्यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांवर गंडांतर!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून बुधवारी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे शिवसेनेचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. या वेळी नेते, उपनेत्यांची संख्या व पदांसह नावातही फेरबदल होण्याची तसेच काही बड्या नेत्यांना अर्धचंद्र मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

शिवसेना भवनात बुधवारी होणा-या बैठकीत याबाबत रीतसर घोषणा होईल. ही सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे व्हावी यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. बाळकृष्ण जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत प्रक्रिया पार पडेल. नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी व जिल्हाप्रमुख या पदाधिका-या नाच निमंत्रित करण्यात आले आहे. शिवसेनेत आजवर शिवसेनाप्रमुख हे सर्वोच्च पद, तर नेते, उपनेते, संपर्क नेते, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख व त्यानंतर उपप्रमुख अशा पद्धतीची पक्षीय रचना होती. 2004 मध्ये महाबळेश्वरच्या बहुचर्चित अधिवेशनात राज ठाकरे यांच्या ‘त्या मागणी’वरून उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. अशा पद्धतीची ही पहिलीच नियुक्ती होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबरला निधन झाल्यानंतर उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख एकच होते आणि राहतील, असे जाहीर केले होते. त्यामुळे पक्षातील सर्वोच्च पदाला कोणते संबोधन मिळणार याकडे सैनिकांचे लक्ष लागले होते.
या विद्यमान नेत्यांना नारळ ?
शिवसेनेत सध्या मनोहर जोशी, लिलाधर डाके, दत्ताजी नलावडे, सुधीर जोशी, सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते, गजानन किर्तीकर, रामदास कदम हे नेते आहेत. यातील डाके, नलावडे व सुधीर जोशी हे वय व आजारपणामुळे सध्या फारसे सक्रीय नाहीत, तर मनोहर जोशी ‘अतिसक्रिय’ आहेत, त्यामुळे त्यांना आदराने निरोप मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शिवसेना नेते या किंवा समकक्ष पदावर उद्धव यांच्या निष्ठावंतांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. वादग्रस्त राहिलेले मिलिंद नार्वेकर यांच्यासह विनोद घोसाळकर, नीलम गो-हे, अनिल देसाई, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अ‍ॅड. अनिल परब यांची नेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. काही उपनेत्यांना नारळ देतानाच नवीन नियुक्तीत राज्यातील प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
थोडेफार बदल होऊ शकतात
शिवसेनेचे 13 नेते होते. त्यापैकी काहींचे निधन झाले. तीन-चार थकले आहेत. पक्षात बदलाची प्रक्रिया सुरूच असते. परवाच्या बैठकीत थोडेफार बदल- फेरबदल होऊही शकतात.’
संजय राऊत, शिवसेना नेते व प्रवक्ते.