आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचार : ठाकरेंचे भाषण २८ मिनिटांचे; एमआयएम, संभाजीनगर आणि हिंदुत्वावरच दिला भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रात,राज्यात सत्ता असताना प्रथमच महापालिका निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाणाऱ्या युतीला बंडखोरीने ग्रासले आहे. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (१९ एप्रिल) झालेल्या जाहीर सभेत २८ मिनिटांच्या भाषणात मिनिटे बंडखोरांवर खर्च केली. एमआयएमला इशारा देताना, हिंदुत्वाचे नारे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर त्यांनी टीकाही केली.
युतीची संयुक्त प्रचारसभा आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झाली. या वेळी भाजपे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री रामदास कदम, सेनेचे सचिव अनिल देसाई, विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, आमदार अतुल सावे, खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यापूर्वीच्या निवडणुकांत बंडखोरांची हकालपट्टी झाली आहे, असे सांगून विषय संपवला जात होता. मात्र, आज चित्र वेगळे होते.

नाती बघू नका : ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाला उमेदवारी हवी असते. त्यामुळे उमेदवारी देताना कुणा ना कुणावर तरी अन्याय होतोच. शेवटी पक्षाला पण नाइलाजाने निर्णय घ्यावेच लागतात. ही लढाई बिकट आहे. मी बंडखोरांना निर्वाणीचा इशारा देतो की या बिकट लढाईत मध्ये आलात आणि जर का विपरीत काही घडले आणि मनपावर हिरवा झेंडा फडकला तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल. या निवडणुकीत कोण कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा ही नाती बघू नका. पक्षाचे नाते बघा, असे म्हणत त्यांनी किशनचंद तनवाणी यांचे नाव घेता हल्ला चढवला. रस्त्यांवरचे खड्डे बुजवले जातील; पण भलतेसलते घडले तर तो खड्डा कसा भरून निघेल, असा सवाल त्यांनी केला.
महिला आघाडीला शब्द : उमेदवारीवरून शिवसेना महिला आघाडीने केलेल्या आंदोलनाची दखल ठाकरे यांनी घेतली. ते म्हणाले की, ज्या महिला नाराज झाल्या, त्या मुंबईत आल्या, मला भेटल्या. त्या म्हणाल्या, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत, आम्ही दुसरीकडे कुठे जाणार? त्या वेळी मी त्यांना शब्द दिला आहे, तुमच्या भविष्याची जबाबदारी मी घेतो.

यांची झाली भाषणे : रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या बंडखोरांना पक्षातून तत्काळ काढून टाकण्याची घोषणा करताना एमआयएमलाच निशाण्यावर घेतले. शहराच्या विकासात डीएमआयसीमुळे भर पडणार असल्याचे सांगत आगामी पाच वर्षांत जालना औरंगाबाद हे जुळे शहर होईल त्यातून विकास मोठ्या प्रमाणावर होईल असा दावा केला. या वेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत बंब, संदीपान भुमरे, जयप्रकाश मुंदडा, अर्जुन खोतकर, प्रदीप जैस्वाल, महापौर कला ओझा, अंबादास दानवे यांचीही उपस्थिती होती.
विकासाबाबत एवढेच

ठाकरेंनी समांतर, रस्ते हे विषय आहेतच, असे सांगत त्यावर काहीच भाष्य केले नाही. कदम यांनी पर्यटन हबबाबत केलेल्या घोषणेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, औरंगाबाद पर्यटन हब करण्यासाठी रामदासभाईंनी २०० एकर जागा मिळवून दिली आहे. ती आम्ही बळकावलेली नाही. रस्ते समांतर जलवाहिनीची कामे राज्यात भाजप- सेना युतीचे सरकार आल्यावर सुरू झाली आहेत. गुंठेवारीचा निर्णय आम्ही घेतला, काँग्रेसने ते सत्तेत असताना तो का घेतला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आघाडीवर टीका

ठाकरे यांनी औरंगाबादला निधी देण्यात पक्षपात केल्याचा आरोप आघाडीवर केला. ते म्हणाले की, आम्ही ११०० कोटी रुपये शहरासाठी मागितले होते; पण भीक दिल्यासारखे एक कोटी रुपये दिले. येथे आमची सत्ता असल्याने त्यांनी सुडाची वागणूक दिली. अशोक चव्हाण यांनी सेनेला २५ वर्षांत शहरासाठी काय केले, असा प्रश्न केला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, आम्ही तुमच्यासारखा आदर्श तर इथे नाही ना केला? असा टोला मारून शरद पवारांवर भूखंड बळकावल्यावरून टीका केली.

एमआयएम, हिंदुत्व आणि संभाजीनगर

एमआयएमवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, शिवसेना भाजपने युती केली. विधानसभेला फाटले होते. पण आता युती केली; कारण हे एमआयएमचे पिल्लू आले आहे. मनपावरचा भगवा उतरवून हिरवा फडकवण्याची भाषा सुरू आहे. आम्हाला आव्हान देऊ नका, असे सांगत त्यांनी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करणारच, असे पुन्हा ठासून सांगितले.