औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निवडणुकीच्या जाहीरनाम्याला वचननामा म्हणत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याला व्हिजन डॉक्युमेंट असे नाव दिले आहे. त्याची माहिती त्यांनी गुरुवारी औरंगाबादसह 13 शहरांतील शिवसेना पदाधिका-यांना दिली.
व्हर्च्युअल तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी सकाळी पदाधिका-यांशी संवाद साधला. महायुतीची सत्ता आल्यावर औरंगाबादला पर्यटन हब, नागपूरला ट्रान्सपोर्ट नगरी, अमरावतीला कृषी केंद्र, नाशिकला सांस्कृतिक नगरी, पुण्याला शैक्षणिक तर सोलापूरला एस्कॉर्ट हब म्हणून उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे फक्त संकल्प चित्र असून अंतिम मसुद्यात प्रत्येक घटकाला न्याय देणारे धोरण जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी bhagwamaharashtra@gmail.com वर सूचना करण्याचे आवाहन त्यांनी केले. आतापर्यंत पाऊस किती झाला. पिकांची काय स्थिती आहे, अशीही विचारणा केली.
शिवसेनाप्रमुखांनी भगव्या महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले. ते पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे भावनात्मक आवाहन त्यांनी केले. चला, उठा महाराष्ट्र घडवूया या विकास चित्रफितीचे सादरीकरणही करण्यात आले. या वेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महापौर कला ओझा, आमदार प्रदीप जैस्वाल, सहसंपर्कप्रमुख किशनचंद तनवाणी, जिल्हा उपप्रमुख बंडू ओक, राजेंद्र राठोड, सभापती विजय वाघचौरे, मनपातील शिवसेना गटनेते गजानन बारवाल, सभागृहनेते किशोर नागरे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुनीता आऊलवार, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, संतोष जेजूरकर, मीरा देशपांडे, अनिता मंत्री, प्रतिभा जगताप, सविता कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.