आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udhav Thakare's Drought Tour Ending Within 40 Minutes

उध्‍दव ठाकरे यांचा दुष्‍काळ दौरा अवघ्‍या 40 मिनिटात आटोपला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दुष्काळी भागाचा दौराही केला नाही की दुष्काळही जाहीर केला नाही, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आणि हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये दुष्काळाचा आढावा घेत मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळावर चारा, टँकरचे वाटप करून मुंबई जवळ केली. या मैदानावर ठाकरे अवघी 40 मिनिटे होते. येत्या काही दिवसांत मराठवाड्यात दुष्काळी परिषद घेणार असल्याचे ठाकरे यांनी तेथे जाहीर केले.

शिवसेनेच्या वतीने मदत म्हणून देण्यात येणारा चारा, टँकर्स व अन्नधान्याचे वितरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना ते म्हणाले, यंदाचा दुष्काळ 1972 पेक्षाही भीषण असल्याचे शरद पवार सांगत असले तरी अधिकृत दुष्काळ मात्र त्यांनी जाहीर केला नाही. जालना येथे जाहीर सभा घेऊन मीच सर्वप्रथम दुष्काळी दौरा केल्याचा दावाही त्यांनी केला. पवारही जालना जिल्ह्यात येऊन गेले असे निदर्शनास आणून दिले असता त्यांनी पुन्हा पुन्हा दौरा करावा अशी सूचना केली. ठाकरे यांनी शहरालगतच्या एखाद्या दुष्काळी गावाची पाहणी करणेही टाळले. आमचे आमदार, खासदार गावोगाव मेहनत घेत आहेत, असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला अन् कार्यक्रम संपताच खास विमानाने मुंबईला रवाना झाले. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, विनोद घोसाळकर, अनंत गिते, खासदार चंद्रकांत खैरे, राजकुमार धूत, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, किशनचंद तनवाणी, महापौर कला ओझा, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व नरेंद्र त्रिवेदी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

धूत यांच्या नाराजीची दखल : उद्धव हे चारा तसेच टँकरची पाहणी करत असताना खैरे हे मला मागे टाकतात, असे खासदार राजकुमार धूत यांनी हळू आवाजात दिवाकर रावते यांना सांगितले. हे नेमके ठाकरे यांच्या कानी गेल्यामुळे त्यांनी धूत यांना कॅमेर्‍यासमोर आणले.

शेतकर्‍याला मदत : खुलताबाद तालुक्यातील शेतकरी सांडूजी पुंजाजी जाधव यांनी काल आत्महत्येची भाषा केली होती. जाधव यांना शिवसेनेच्या वतीने रोख 25 हजार व चारा उपलब्ध करून देण्यात आला.‘दिव्य मराठी’ने रविवारच्या अंकात जाधव यांची व्यथा मांडली होती.
चार्‍यापेक्षा डिझेलचाच खर्च

शिवसेनेच्या वतीने 60 ते 70 किलोमीटर अंतरावरून चारा आणण्यात आला होता. ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी येणार्‍या खर्चात याच्या तिप्पट चारा खरेदी करता आला असता. त्यामुळे आम्हाला औरंगाबाद शहरात बोलवण्याऐवजी थेट चारा हाती दिला असता तर बरे झाले असते असे 60 किलो मीटरवरून आलेल्या कार्यकर्त्याने सांगितले.


अशी जमा झाली मदत
खासदार धूत : 100 ट्रॅक्टर्स, पहिल्या टप्प्यात दोन हजार लिटर क्षमतेच्या 25 टाक्या, दुसर्‍या टप्प्यात 625 टाक्या.
खासदार खैरे : 2 हजार लिटर क्षमतेच्या 100 टाक्या, 20 ट्रक चारा.
आमदार रवींद्र वायकर : 2 हजार लिटरच्या 200 टाक्या.
आमदार एकनाथ शिंदे : 10 ट्रक धान्य, 12 टाक्या.
आमदार मीरा रेंगे : 2 लाख कडबा पेंढय़ा.