औरंगाबाद- वकिली व्यवसायाबद्दल सध्या फारसे चांगले बोलले जात नाही. कुठली महत्त्वाची गोष्ट सांगितली तरी काय वकिलांसारखा बोलतो, असा टोमणा हाणण्यात येतो. वास्तविक पाहता समाजातील हुशार आणि पारखून मत मांडणारा अशी वकिलांची प्रतिमा असून ती जपणे आवश्यक आहे. शिवाय या व्यवसायातील पावित्र्य जपावे, असे आवाहन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
भराडी हत्याकांड प्रकरणात बाजू मांडण्यासाठी निकम जिल्हा न्यायालयात आले होते. या वेळी जिल्हा वकील संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, आज वकिली व्यवसायात येणारी नवी पिढी करिअर करण्यासाठी येत आहे. सध्या वरिष्ठ वकिलांकडे प्रॅक्टिस करणार्या तरुण वकिलांना पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे या क्षेत्राबद्दल तरुणांमध्ये निरुत्साह वाढत आहे. तरुण वकिलांना मोबदला देण्याची गरज असल्याचे मत निकम यांनी व्यक्त केले. न्यायाधीश आणि वकील यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. वकिली व्यवसायात नव्याने येणारे वकील नवनवीन संदर्भ हाताळत आहेत. इंटरनेटवरून अनेक नव्या संदर्भाच्या माध्यमातून अभ्यास करत आहेत. मात्र, त्याच वेळी वकिलांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता व्यवसायाचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे, असे निकम म्हणाले. कार्यक्रमाला जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. के. जी. भोसले, अँड. भीमराव पवार, अँड. मंगेश जाधव, अँड. एस. एम. रझवी, अँड. छाया पडोळ झुंजुर्डे, नंदा गायकवाड, डी. एन. पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.