आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेच्या साध्या सवयींतून विद्यार्थ्यांना दिले आरोग्यभान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आधुनिक जीवनापासून कोसो दूर असणाऱ्या दुर्गम भागांत शाळांना विद्यार्थी मिळणेच महाकठीण. तिथे या मुलांच्या आरोग्याकडे ना प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष असते ना पालक विशेष काळजी घेतात. मात्र, कुपोषणाची सुरुवात ठरू शकणारा हा प्रकार रोखण्यासाठी सामाजिक संस्थेसह विप्रो कंपनीच्या सीएसआर विभागाने पुढाकार घेत जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ३६ जिल्हा परिषद शाळांत "उज्ज्वल भारत’हा उपक्रम सुरू केला. स्वच्छतेच्या छोट्या छोट्या सवयींतून या विद्यार्थ्यांत आरोग्यभान रुजवले जात आहे.
ग्रामीण तसेच दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती यथातथा आहे. अपुरा शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीकडे लक्ष देऊ शकत नाही. शाळेत मिळणाऱ्या पोषण आहारामुळे पालकही मुलांच्या आरोग्याबाबत फारसे सजग नसतात. खाऊसाठी दिलेल्या पैशांतून ही मुलं काय खरेदी करतात, याकडेही पालकांचे विशेष लक्ष नसते. याच कारणांमुळे सावित्रीबाई फुले एकात्म महिला समाज मंडळाने या विषयावर काम करणे निश्चित केले. विप्रो कंपनीच्या सीएसआर विभागाची त्यांना साथ मिळाली अन् ३६ शाळांमध्ये उज्ज्वल भारत हा आरोग्यदायी उपक्रम सुरू झाला.

नखे कापणे, शौचास जाताना आणि जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे, अशा साध्या सवयींकडे ग्रामीण भागात विशेष लक्ष दिले जात नाही. राबण्यासाठी हात हवेत म्हणून मुलांनाही शेतीच्या कामात जुंपले जाते, परंतु त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वाढत्या वयानुसार आहार अशा बाबीही दुर्लक्षित असतात, असा प्राथमिक निष्कर्ष २०१४-१५ मध्ये विप्रो सीआरच्या टीमने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला. डॉ. पाटील म्हणाल्या, प्राथमिक आरोग्य म्हणजे ज्याची सुरुवात स्वच्छतेपासून होते. त्याकडेच पालक दुर्लक्ष करतात. शाळांमध्येही फारशी जागरुकता केली जात नाही. या संदर्भात आम्ही केलेल्या सर्वेक्षणातून अनेक बाबी समोर आल्या. त्यामुळे नियमित दात घासणे, नखे कापणे, शौचास जाऊन आल्यावर आणि जेवणापूर्वी साबणाने स्वच्छ हात धुणे, शाळेला येताना न्याहारी करणे जंकफूड टाळणे या स्वच्छतेच्या पाच सवयींवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी माझे सहकारी नितीन वाकळे यांचे मोलाचे सहकार्य मिळते.

यश मिळाले
इयत्ता पहिलीते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जातो. २०१४ मध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाला आता कुठे यश मिळण्यास सुरुवात झाली आहे. -डॉ. सई पाटील, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर

बैठकीतून मार्गदर्शन
वैजापूर,फुलंब्रीसह जिल्ह्यातील ३६ जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. शिक्षक-पालकांची बैठक घेऊन त्यांनाही जागरूक केले जाते. स्वच्छताविषयक व्हिडिओ आणि खेळांद्वारे सवयी रुजवल्या जातात. प्रत्येक गावात आराेग्यमित्रही प्राथमिक उपचार करण्यासह स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात.

३७% मुलं घासतात दात
प्रोजेक्टको ऑर्डिनेटर डॉ.सई पाटील म्हणाल्या, सन २०१४ पासून हा उपक्रम राबवला जात आहे. दुर्गम भागात नियमित दात घासणाऱ्या मुलांचे प्रमाण अवघे ३७ %आहे.७६ %मुलेसकाळी न्याहारी करत नाहीत. सवयी लावताना आधी अडचणी आल्या, पण आता शिक्षकांसह पालकांचे सहकार्य मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...