आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्मस्टार बिघडले, निवडणूक लढून पाहा; उमा भारतींचा अभिनेत्यांना सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सध्या फिल्मस्टार बिघडले आहेत. त्यांनी राजकारणावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष राजकारणात उतरून निवडणुका लढवाव्यात आणि आव्हान स्वीकारावे, असा सल्ला केंद्रीय जलसंपदा, नदी विकास गंगा पुनरुज्जीवन मंत्री उमा भारती यांनी आमिर खान आणि शाहरुख खान यांचा नामोल्लेख टाळत दिला. गजेंद्र चौहानांना विरोध ही डाव्यांची असहिष्णुताच असल्याचा आरोपही त्यांनी केला. औरंगाबादेत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

"वाल्मी'मध्ये सुरू असलेल्या पाणी वापर संस्थांच्या परिषदेचा समारोप भारतींच्या उपस्थितीत झाला. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची उपस्थिती होती. या परिषदेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, आमच्या विरोधात सातत्याने असहिष्णुतेचा आरोप केला जातो. मात्र, ज्या पद्धतीने गजेंद्र चौहानांना विरोध केला जात आहे, हीदेखील असहिष्णुताच आहे. चौहानांना पदभारही घेऊ दिला जात नाही. ते चांगले काम करणारे आहेत. त्यांना काम तरी करू द्या. केवळ त्यांना विरोध केला जात आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास मी त्यांच्या मदतीसाठी जाणार असल्याचे भारती यांनी स्पष्ट केले.

सुरक्षा कमी करण्याचा सरकारशी संबंध नाही : सध्याप्रत्येक गोष्टीवर सरकारला स्पष्टीकरण मागितले जात आहे. अभिनेत्यांची सुरक्षा का कमी केली याचीही विचारणा केली जात आहे. मात्र, त्याचा सरकारशी संबध नाही. याबाबत सुरक्षा यंत्रणांकडून आढावा घेतला जातो. जेव्हा संबंधिताला धोका वाटल्यास सुरक्षा वाढवली जाते, अन्यथा कमी केली जाते. अामिर खानच्या अतुल्य भारतचा करार एका एनजीओने केला होता. त्यामुळे प्रत्येक वेळी सरकारला स्पष्टीकरण मागणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात आत्मनिंदा करण्याची एक प्रथाच आहे. सुरुवातीला अतुल्य भारतच्या नावाने जाहिरात करायची आणि त्यानंतर पत्नीच्या सांगण्यावरून असहिष्णुता असल्याचे सांगत जगभर बदनामी करायची, असा टोमणाही त्यांनी आमिरला लगावला.

श्रीदेवीच्या वडिलांचे डिपॉझिट जप्त : अभिनेतेराजकीय मते व्यक्त करत टीका करत असल्यामुळे त्यांना लोक किती गांभीर्याने घेतात याचा त्यांनीच विचार करावा. त्यांनी निवडणूक लढवावी. नंतरच त्यांना कळेल की लोक त्यांना किती गांभीर्याने घेतात. श्रीदेवीचे वडील निवडणुकीत उभे राहिले होते. महिनाभर श्रीदेवीनेही प्रचारही केला. मात्र, त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, अशी आठवणही भारती यांनी करून दिली.

पठाणकोटचे मिशन ज्या पद्धतीने हाताळले जगातले सर्वोत्कृष्ट मिशन असल्याचे सांगत भारती यांनी मोदींची पाठराखण केली. अयोध्येत डिसेंबरपर्यत मंदिर उभारण्याबाबत सुब्रमण्यम स्वामी तसेच इतर नेते बोलत आहेत, या विषयावर त्यांनी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असे सांगत या विषयावर अधिक बोलणे टाळले.
बातम्या आणखी आहेत...