आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unauthorized Religious Place Issue At Aurangabad, Divya Marathi

एक मंदिर पाडणार असाल, तर एक मशीदही पाडा - शिवसेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकाही धार्मिक स्थळाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका घेणार्‍या शिवसेनेने आता काहीशी नरमाईची भूमिका घेत एक मंदिर आणि एक मशीद सोबतच पाडणार असाल, तर कारवाई करू देऊ, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे आक्षेप अर्जांवर विचारमंथन, कारवाईची पूर्वतयारी, बैठका यात मनपा प्रशासनाचा आजचा दिवस संपला. आता न्यायालयाची डेडलाइन संपायला फक्त 3 दिवस बाकी आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ता रुंदीकरणाआड येणारी धार्मिक अतिक्रमणे हटवण्यासाठी मनपाला 31 मेपर्यंतची डेडलाइन देण्यात आलेली आहे. ती तारीख उलटण्याच्या आत काहीतरी कारवाई करणे मनपाला भाग आहे. त्यांची तयारी सुरू असली, तरी या मोहिमेला होणारा विरोध पाहता सावधगिरीने कारवाई करावी लागत आहे. मुस्लिम धर्मगुरू व नेत्यांनी या मोहिमेला स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवला, तर शिवसेनेनेही ताठर भूमिकाच घेतली होती.
मनपा प्रशासनाला सवाल
आज खासदार चंद्रकांत खैरे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. त्यात खैरे यांनी पदमपुर्‍यातील राम मंदिर व हनुमान मंदिर पाडू देणार नाही हे स्पष्ट करतानाच इतर ठिकाणांबाबत नरमाईची भूमिका घेतली. ते म्हणाले की, आम्ही चार मंदिरे काढू, पण तुम्ही चार मशिदी काढणार का, असा माझा मनपा प्रशासनाला सवाल आहे. फक्त मंदिरे काढणार असाल, तर तीव्र विरोध करू. कारवाई हाणून पाडू. एक मंदिर काढा, एक मशीद काढा. त्यासाठी वाटल्यास जागा द्या; पण सर्वांना समान न्याय दिलाच पाहिजे. बसून चर्चा केली, तर निश्चितच मार्ग निघू शकतो, असे सांगताना त्यांनी मनपा आयुक्त व पोलिस आयुक्तांना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले की, हे दोन्ही आयुक्त शहराचे वातावरण खराब करायला निघाले आहेत. आमदार प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, सुहास दाशरथे, किशोर कच्छवाह, महापौर कला ओझा, पप्पू व्यास आदींची भाषणे झाली. या वेळी अंबादास दानवे, राजू वैद्य, विकास जैन, सुशील खेडकर, नंदकुमार घोडेले हजर होते.