आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unauthorized Religious Places Issue At Aurangabad, Divya Marathi

अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईसाठी पोलिसांची जय्यत तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याबाबत मनपाने दिलेल्या नोटिसीची मुदत आज संपली आणि उच्च न्यायालयाकडून कारवाईला मुदतवाढ मिळवण्याचा मनपाचाही प्रयत्न फसला. आता ही बांधकामे हटवण्याशिवाय मनपासमोर पर्याय राहिला नसून कोणत्याही क्षणी मोहीम सुरू होणार आहे. या मोहिमेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एसआरपीच्या दोन तुकड्या शहरात दाखल झाल्या असून सर्व पोलिस ठाण्यांना त्यांच्या हद्दीत होणार्‍या मोहिमेच्या बंदोबस्तात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रस्ता रुंदीकरणाआड येणारी अनधिकृत धार्मिक बांधकामे हटवण्याबाबत उच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यातच मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना 31 मेपर्यंत ही बांधकामे हटवा आणि 9 जूनच्या सुनावणीदरम्यान अहवाल सादर करा, असे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मनपाने थेट लोकसभा निवडणुकीनंतरच हालचाली सुरू केल्या. या कारवाईसंदर्भात पोलिस आयुक्तांनी बैठक बोलावून सर्वांना सहकार्याचे आवाहन केले, पण हिंदू आणि मुस्लिम नेत्यांनी या कारवाईवर आक्षेप घेत कायदेशीर बाबींची पडताळणी करून निर्णय घेण्याची मागणी करीत विरोध दश्रवला. दुसरीकडे, ही कारवाई करणे मनपासाठी अडचणीचे ठरणार आहे. कारवाई केली तरी विरोधाची शक्यता आणि न केली तर उच्च न्यायालयाचा अवमान अशा द्विधा अवस्थेत मनपाची कोंडी झाली आहे. त्यामुळेच आज मनपाने उच्च न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल करून मुदतवाढ मागण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयाने काहीच आदेश न दिल्याने तो फसल्यातच जमा आहे.

विचार करून निर्णय : आयुक्त
बैठकीनंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले की, अशा विषयांत विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. तसाच निर्णय आम्ही घेऊ. मुदतवाढीसंदर्भात काय, असे विचारले असता ते म्हणाले की, आम्ही न्यायालयासमोर आमचे म्हणणे सादर केले. त्यावर न्यायालय काय तो निर्णय घेईल.

250 जवान दाखल
पोलिसांनी मोहिमेची जय्यत तयारी केली आहे. एसआरपीचे जवळपास 250 जवान दाखल झाले आहेत. याशिवाय पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होणार असून हद्दीतील बंदोबस्तात कसूर न करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. मोहिमेचे वेळापत्रक आणि अंमलबजावणी हा मनपाचा विषय असल्याने त्यांनी ठरवले की कारवाई सुरू होईल, असे आयुक्तांनी याआधीच स्पष्ट केले.

इतर अधिकार्‍यांचा सहभाग
सूत्रांप्रमाणे, पोलिस आयुक्तांनी मनपा आयुक्तांना तुम्ही निर्णय घ्या, आम्ही बंदोबस्त पुरवू, असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हाधिकार्‍यांनीही दोन्ही अधिकार्‍यांशी चर्चा केली. शहर अभियंता सखाराम पानझडे, नगररचना सहायक संचालक डी. पी. कुलकर्णी, अतिक्रमण हटावचे प्रमुख शिवाजी झनझन, विधी सल्लागार ओ. सी. शिरसाट सहभागी झाले.