आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लक्षवेधी: पुलाखालील पार्किंग देईल 2 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील उड्डाणपुलाखालच्या जागा भिकारी आणि बेघरांनी काबीज केल्या आहेत. तेथे घाण आणि कचरा जमा होतो. मात्र, हीच जागा स्वच्छ करून तेथे नागपूरच्या धर्तीवर सार्वजनिक पार्किंगची सोय करून दिल्यास वाहतुकीची कोंडी ४० टक्के कमी होऊ शकते. शिवाय पार्किंगमधून मिळणाऱ्या पैशांतून मनपाच्या तिजोरीत दोन कोटी रुपये जमा करता येतील.
शहरात रेल्वेस्टेशन, क्रांती चौक, मोंढा नाका, सेव्हन हिल्स, संग्रामनगर आणि मनपाजवळील टाऊन हॉल येथे उड्डाणपूल आहेत. तसेच लवकरच बाबा पेट्राेल पंप, वसंतराव नाईक चौक या उड्डाणपुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. उड्डाणपूल झाला की काही महिन्यांतच पुलाखालची जागा भिकारी काबीज करतात. तसेच काही मंडळी पुलाखाली अवैध कृत्येही करतात. या समस्येवर सर्वप्रथम नागपूर महापालिकेने तोडगा शोधून काढत पुलाखाली सार्वजनिक पार्किंगची संकल्पना सुरू करत राज्यातील हा पायलेट प्राेजेक्ट ठरला. जे नागपूरला होऊ शकते ते औरंगाबादेत का होऊ शकत नाही? सर्व पुलाखाली पार्किंग केली तर रस्त्याच्या कडेला लावल्या जाणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडली जाऊ शकते.

अपुऱ्या जागेमुळे लोकांनी रस्त्यावर उभी केलेली वाहने उचलून न्यावी लागतात. अशा प्रकारच्या पार्किंगची व्यवस्था केल्यास वाहतुकीवरील ताण कमी हाईल. खुशालचंद बाहेती, सहायकपोलिस आयुक्त

नागपूर शहराचीलोकसंख्या ३० लाखांवर आहे. वाहतूक यंत्रणेवरचा ताण कमी व्हावा या दृष्टीने उड्डाणपुलाखालच्या पार्किंगचा केलेला प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. असाच प्रयोग येथे केल्यास फायद्याचे ठरेल. - श्रावण हर्डीकर, आयुक्त,मनपा नागपूर

दोन कोटींचे उत्पन्न मिळेल
शहरात रस्ते विकास महामंडळाने तयार केलेले उड्डाणपूल मनपाकडे हस्तांतरित होताच त्या खालच्या जागेची मालकी मनपाकडे येते. या जागेत सशुल्क पार्किंग सुरू केल्यास मनपाला वर्षाकाठी किमान दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

मनपाचे पार्किंग होऊ शकते पुलाखाली
महानगरपालिकाकार्यालय लोकांच्या गर्दीने गजबजलेले असते. परिणामी वाहने लावण्यासाठी टाऊन हॉलजवळील दोन्ही इमारती अपुऱ्या पडतात. मनपाच्या गेटपासून हाकेच्या अंतरावर टाऊन हॉल उड्डाणपूल आहे. तेथे पार्किंग केल्यास मनपाच्या इमारतीसमोरील जागेवर पडणारा वाहतुकीचा ताण कमी होईल.