आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिगत गटार योजनेमुळे \'आडगाव भोसले\' येणार राज्याच्या नकाशावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सांसद आदर्शग्राम योजनेच्या माध्यमातून आडगाव (भोसले) या गावाने कात टाकली आहे. या योजनेंतर्गत गावात अनेक कामे सुरू असून भूमिगत गटार योजना राबवणारे हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरणार आहे. देशाच्या रक्षणासाठी झिजणाऱ्या ग्रामस्थांचे गाव अशी आडगाव भोसले या गावाची ओळख आहे.

प्रत्येक घरातील किमान एक जण सैन्य दलात आहे. गावाचे हे वेगळेपण पाहूनच खासदार चंद्रकांत खैरे यांनी या गावाची सांसद आदर्शग्राम योजनेसाठी निवड केली. या योजनेच्या माध्यमातून गावाला हिवरे बाजारप्रमाणे आदर्श बनवण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे.
कन्नड तालुक्यातील आडगावची लोकसंख्या 2132 आहे. गावात एकूण 556 कुटुंब राहात असून 'सैनिकांचे गाव' अशी देखील या गावाची ओळख आहे. आदर्शग्राम या योजनेमुळे गावाने कात टाकली असून आरोग्याचा प्रश्न सोडवतानाच संत गाडगेबाबा योजनेत सहभाग नोंदवण्याचा निश्चयही ग्रामस्थांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सांसद आदर्शग्राम ही योजना सुरू झाली. खासदारांनी एकेक गाव निवडून त्या गावाचा सर्वांगीण विकास करावा, ही गावे आदर्श करावीत, या उद्देशाने सुरू झालेल्या या योजनेमुळे अनेक गावांचे रुपडे बदलले आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी या योजनेअंतर्गत आडगावची निवड करून ग्रामस्थांना गावविकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने गावातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून पाच वर्षांमध्ये 21.7 कोटींचा निधी खर्च करून गावात अनेक विकासकामे केली जाणार आहेत.

ही कामे होणार
पीक प्रात्यक्षिके, शेती अभ्यास दौरे, विहिर फेरभरण, अंगणवाडी बांधकाम, रस्त्यांचे डांबरीकरण, अंतर्गत सिमेंट रस्ते, ग्रामपंचायत इमारत, सार्वजनिक शौचालये, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, सौरदिवे बसवणे आदी कामे केली जाणार आहेत.

हे असेल वेगळेपण
शाश्वत विकासासाठी गावामध्ये 100 कुपोषमुक्ती, माती सक्षमीकरण, किशोरी प्रशिक्षण, सुधारीत वीज मीटर, व्हर्च्युअल क्लासरूम, प्रत्येक ग्रामस्थाची आधार नोंदणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे गावाला 100 टक्के साक्षर करण्याबरोबरच याच योजनेतून होणारी स्टीलची जलवाहिनी आणि पूर्ण गाव वायफाय कनेक्टिव्हिटीने जोडणे ही कामे गावाचे वेगळेपण ठसवणारी ठरणार आहेत.
तीन किलोमीटरची पाइपलाइन
भूमिगत गटार योजना राबवण्याचा निर्धार केल्यानंतर गावात प्रत्येक घरात शौचालय उभारले जाणार आहे. हे घाण पाणी, मैला गावापासून दूर तीन किलोमीटर अंतरावर उभारलेल्या खड्ड्यांमध्ये सोडले जाणार आहे. सोनखत निर्मिती करण्याचाही ग्रामस्थांचा मानस आहे.

आराखडा तयार
सांसद आदर्शग्राम योजनेच्या माध्यमातून गावाचा कायापालट व्हावा, या भावनेने कामास सुरुवात केली. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळत असल्यामुळे हे गाव हिवरेबाजारप्रमाणे आदर्श करण्याचा निर्धार केला आहे. भूमिगत गटार योजना राबवणारे हे राज्यातील पहिले गाव ठरणार आहे.
- चंद्रकांत खैरे, खासदार, औरंगाबाद

गावविकासासाठी झोकून देणार
या योजनेमुळे गावाची विकासाच्या दिशेने वाटचाल होत आहे. गावात होणाऱ्या विकासकामांमुळे रोजगाराचा प्रश्नही सुटला आहे. भूमिगत गटार योजनेनंतर स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.
- शोभाबाई बोलकर, सरपंच, आडगाव (भोसले)
बातम्या आणखी आहेत...