आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ अंतर्गत रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव कुलपतींकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. नव्याने डांबरीकरण करणे गरजेचे आहे. स्थावर विभागाने विद्यापीठामार्फत कुलपतींकडे अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. 

सर्व प्रक्रियेनंतर मंजुरी आली की, लगेच कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. 
विद्यापीठात एकूण ९. किलोमीटरचे अंतर्गत रस्ते आहेत. त्यापैकी विद्यापीठ गेट ते वाय पाॅइंट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला आहे. 
 
२०१४-१५ दरम्यान या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. सुमारे ११०० मीटर लांबी आणि ११ मीटर रुंदी असलेल्या या रस्त्यासाठी त्यावेळी कोटी ५७ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. या रस्त्यावरून विद्यापीठात प्रवेश करणाऱ्यांना विद्यापीठाची भव्यता आणि पायाभूत सुविधांचा अंदाज येतो. 
 
मात्र बाबासाहेबांचा पुतळा ते प्रशासकीय इमारतीपर्यंत जातांना पुन्हा विद्यापीठात किती सुमार दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत..? याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. वाय पॉइंट ते प्रशासकीय इमारतीपर्यंतचा डांबरी रस्ता अक्षरश: पूर्णपणे उखडलेला आहे.
 
 दुचाकी, चारचाकी धारकांनाच काय पादचाऱ्यांनाही येथून जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. यासंदर्भात स्थावर विभागात चौकशी केली असता या रस्त्यासाठी ८० लाखांची तरतूद असल्याचे सांगण्यात आले. 

२५ लाखांपेक्षा अधिकचे काम विद्यापीठाला स्वत: करायचे असेल तर त्यासाठी राज्यपाल तथा कुलपती कार्यालयाची मंजुरी मिळणे अपेक्षित असते. त्यासाठी २१ जानेवारी २०१६ रोजी प्रस्ताव पाठवण्यात आला असून सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर मार्च अखेरीस मंजुरी येण्याची शक्यता आहे. दोन महिने निविदेप्रक्रियेला लागणार आहेत. 
 
ऑगस्टपर्यंत डांबरी रस्त्याचे कामे मार्गी लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाय वाय पाइंट ते वनस्पतिशास्त्र मार्गे इतिहास वस्तुसंग्रहालयापर्यंतच्या रस्त्याचाही प्रस्ताव मंजूर आहे. विद्यापीठ बांधकाम समितीने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. 
 
सर्व रस्त्यांचे नियोजन झाले 
-सिमेंट रस्ते झाल्यानंतर लगेच डांबरीकरणासाठी प्रस्ताव दिलेला आहे. अंतिम मंजुरी आल्यानंतर विद्यापीठ स्वत:च रस्त्यांचे कामे करणार आहे. वाय पाइंट जवळचा गोलाकार रस्ता आणि इतिहास विभागाच्या वस्तुसंग्राहलय ते प्रीआयएएस कोचिंगपर्यंतचे रस्ते प्रस्तावित आहेत. यामध्ये प्रशासकीय इमारतीचे इन आणि आउटचाही समावेश आहे. निधी मिळताच सर्व रस्ते चांगले होतील. -रवींद्र काळे, कार्यकारी अभियंता, स्थावर विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 
बातम्या आणखी आहेत...