आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ चार महिन्यांत भुयारी मार्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ पश्चिमेच्या बाजूला येत्या चार महिन्यांत राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय मंगळवारी (१६ ऑगस्ट) विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हा मार्ग तयार झाल्यानंतरच सध्या वाहनचालक वापरत असलेला पुलालगतचा मार्ग बंद होणार आहे. त्यामुळे बीड बायपासकडे ये-जा करणाऱ्या हजारो वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

रेल्वे उड्डाणपुलाजवळ इतर वाहनांसाठी वाहतुकीचा मार्ग असू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्याची रेल्वे स्टेशन-पैठण रोडवरील उड्डाणपुलाजवळ अंमलबजावणी झाली नाही. मात्र, संग्रामनगर येथे तीन दिवसांपूर्वी वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात आला. देवानगरी, राजनगर येथील नागरिकांना बीड बायपासकडे जाण्यासाठी पुलावरून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे पुलावर प्रचंड गर्दी वाढली. याविरोधात पहिल्या दिवशी ओरड केली.

१२ ऑगस्टला रेल रोको, निदर्शने केल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. काही जणांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे फिर्याद मांडून या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानुसार १६ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या दालनात खैरे यांनी विशेष बैठक घेतली. त्यास जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, नांदेड रेल्वे विभागाचे व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता अशोक खैरे, मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे आदी उपस्थित होते.
रेल्वेस्टेशन समोरील रस्ता दुभाजक हटवून तेथे वाहतूक बेट उभारल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता येईल. त्यासाठी चाचपणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पांडे यांनी मनपाला दिले. या कामासाठी खासदार निधी देऊ असे खैरे म्हणाले. क्रांती चौक - रेल्वे स्टेशन रस्त्यासाठी रेल्वेच्या जागेचे भूसंपादन तात्काळ करावे, असेही खैरे म्हणाले. तेव्हा सिन्हा यांनी आठ दिवसात मनपाला जागेचा ताबा देऊ, असे म्हटले. पानझडे यांनी भूमिगत गटार योजनेच्या पाच वाहिन्या रेल्वे मार्गाखालून जाणार आहेत. त्या कामालाही गती द्यावी, अशी मागणी केली. त्यावर चार वाहिन्यांना परवानगी दिली असून पाचव्या वाहिनीचे आराखडा बदलून दिल्यास त्यालाही परवानगी देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्गासंबंधी सकारात्मक चर्चा झाली. मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावरील कामे दोन महिन्यांत पूर्ण होतील तसेच औरंगाबाद रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याची प्राथमिक चाचणी होऊन तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बॉटल क्रशर मॉडेल रेल्वेस्थानकात बसवण्यात येणार असल्याचेही सिन्हा म्हणाले.
निधी राज्य शासनाचा
हामार्ग तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा निधीचा होता. त्यावर खासदार खैरे यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठकीतूनच संपर्क साधला. हजारो नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली. तेव्हा शिंदे यांनी दहा कोटी रुपये देऊ, असे आश्वासन दिले. निधीसाठी आपणही प्रयत्न करू असे दांगट म्हणाले.

येथेही होणार भुयारी मार्ग
मुकुंदवाडी, दौलताबाद, लासूर, रेल्वे स्टेशन एमआयडीसी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, औद्योगिक महामंडळाकडून पूल भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाला देण्यात आला आहे. ही कामे सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करावीत, असे ठरले. रेल्वे स्टेशन एमआयडीसी येथे पूल उभारणीपोटी महापालिकेने ४६ लाख रुपये द्यावेत, अशी सूचना खैरे यांनी केली. रेल्वे स्थानक गेटसमोरील दुभाजक हटवावे, असेही ते म्हणाले.

सर्वांचा एकच सूर
खासदारखैरे यांनी नागरिकांची बाजू मांडत पर्यायी व्यवस्थेचा आग्रह धरला. जलदूत किशोर शितोळे इतरांनी उड्डाणपुलाचे काम तांत्रिकदृट्या अयोग्य असल्याचा मुद्दा मांडला. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काय, असा प्रश्न दांगट यांनी अधीक्षक अभियंता अशोक खैरे पानझडे यांना विचारला असता त्यांनी भुयारी मार्गाचा पर्याय सुचवला. त्याला डॉ. सिन्हा यांनीही सहमती दर्शवली. सर्व विभागांनी एकत्रित सर्वेक्षण करून भुयारी मार्ग तयार करण्याचे निर्देश दिले.

आठ दिवस गेट बंद राहणार
संग्रामनगर पुलाजवळील वाहतूक मार्गावर वाढलेले अपघातांचे प्रमाण लक्षात घेता भुयारी मार्ग तयार करणे आवश्यक असल्याचे डॉ. सिन्हा म्हणाले. मात्र, त्यासाठी रेल्वे निधी देणार नाही. मार्ग तयार होईपर्यंत रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती इतर कामांसाठी पंधरा दिवसांतून दिवस तर महिन्यातून दिवस गेट बंद ठेवावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...