आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Agriculture Minister Sharad Pawar And State Deputy CM Ajit Pawar At Aurangabad

औरंगाबाद शहराला पाण्यासाठी नऊ कोटी; अजित पवार यांची घोषणा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघा चुलत्या-पुतण्यांमध्ये सुभेदारी विश्रामगृहातील गोदावरी सूटमध्ये 20 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार तथा पवार कुटुंबीयांचे आप्त डॉ. पद्मसिंह पाटील हे या चर्चेचे साक्षीदार ठरले.
रात्रीच दाखल झालेले शरद पवार ‘गोदावरी’मध्ये तर सकाळच्या विमानाने आलेले अजित त्यालाच लागून असलेल्या ‘मांजरा’ सूटमध्ये थांबले होते. सकाळी साडेआठ वाजेपासूनच मोठे पवार कार्यकर्त्यांना भेटत होते. आधी कार्यकर्ते, नंतर आमदार भेटीला येतील, अशी सूचना त्यांनी केली. 9 वाजून 35 मिनिटांनी छोट्या पवारांना ‘गोदावरी’त बोलावणे आले. बरोबर 20 मिनिटे ते आतमध्ये होते. 9 वाजून 55 मिनिटांनी अजित ‘गोदावरी’बाहेर पडले. त्यानंतर पाच मिनिटांनी मोठे पवार बाहेर पडले थेट विभागीय आयुक्तालयाकडे रवाना झाले. कार्यकर्त्यांकडून निवेदने स्वीकारत अजित पवार बैठकीकडे रवाना झाले.
काका-पुतण्यांत खलबते
औरंगाबाद शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा टंचाई प्रस्तावानुसार महापालिकेस नऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (11 फेब्रुवारी) केली.

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयात दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या वतीने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांसंबंधी माहिती दिली. औरंगाबाद शहराला मार्चनंतर पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवणार आहे. तसा प्रस्ताव मनपा आयुक्तांमार्फत प्राप्त झाल्याचे सांगत पवार यांनी नऊ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान केल्याचे जाहीर केले. राज्यात कोल्हापुरी बंधार्‍याचे दरवाजे चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असून त्याला आळा घालण्यासाठी माजलगाव प्रकल्प कॅनॉलवर बसवण्यात आलेल्या एअर गेटच्या धर्तीवर राज्यात सर्वत्र दरवाजे बसवण्याची घोषणाही त्यांनी केली. साईनागझरी (जि. लातूर) येथील पाणीपुरवठा योजनेचे तोडण्यात आलेले वीज कनेक्शन जोडण्याचे आदेश दिले असून जालना शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे 11 कोटी 50 लाख रुपये वित्त विभागाच्या वतीने तत्काळ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना 31 मार्च 2013 पर्यंत पूर्ण होणार आहे.

उस्मानाबाद पाणीपुरवठा योजनेसाठी राज्याने 51 कोटी मंजूर केले असून आतापर्यंत 15 कोटी देण्यात आले, तर उर्वरित 26 कोटी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता तत्काळ दिले जातील. ही योजना 28 फेब्रुवारी 2013 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे पवार म्हणाले. गुरांच्या छावण्या उभारण्यासंबंधी ग्रामपंचायतींना अधिकार दिले जातील, दुष्काळी भागातील फळबागांचे सर्वेक्षण केले जाईल, नागरी व शहरी भागासाठी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांच्या आर्थिक अधिकारात वाढ केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील नगरपालिकांचे पाणीटंचाईसंबंधी अति तीव्र, तीव्र, सौम्य व अति सौम्य असे चार भागांत वर्गीकरण करण्यात आले असून यानुसार पाणीपुरवठय़ासाठी अंमलवजावणी करण्यात येणार आहे. पाण्याचे टँकर दोन कि. मी. अंतरावरून आणण्यासंबंधीचा नियमही शिथिल केला जाणार असून आता टँकरच्या पाण्यासाठी पाच कि. मी. परिसर र्मयादा घातली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

खिमा अन् चिकन
शरद पवार यांचे रात्री 11 वाजेच्या सुमारास जालन्याहून सुभेदारी विश्रामगृहावर आगमन झाले. त्यांनी उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यासह येथील खानसाम्याने त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या मटन खिम्यावर ताव हाणला. खास गावरान चिकनही मागवण्यात आले होते. सकाळी पवार यांनी फळांचा रस तेवढा घेतला.

असा येईल अन् असा जाईल व्हिजिटर
व्हिजिटरला त्रास होणार नाही, याची शरद पवार खबरदारी घेतात. याचा प्रत्यय आज येथील व्हिजिटर्सना नि येथील कर्मचार्‍यांना आला. गोदावरी या सूटमध्ये ते बसले होते. तेव्हा मागील बाजूचा दरवाजा उघडा करण्यास त्यांनी कर्मचार्‍यांना सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव हा दरवाजा बंद होता. भेटीस आलेला व्हिजिटर या मार्गाने बाहेर जाईल, म्हणजे गर्दी होणार नाही, असे त्यांनी सांगितले.