औरंगाबाद - वेतनवाढी संदर्भात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनतर्फे संप पुकारण्यात आला होता. यामुळे शहरातील विविध बँकांच्या १४० शाखांवर १३ नोव्हेंबर रोजी १४०० कोटी रुपयांच्या क्लिअरिंगचा भार पडणार आहे. वाढीव काम करण्यासाठी अधिक वेळ काम करण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने लोकांना अनेक बँकांत सलग दोन दोन दिवस म्हणजे गुरुवार, शुक्रवारी रांगा लावाव्या लागणार आहेत. काही ठिकाणी वादावादीचे प्रसंगही उद्भवणार आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना कटकटीला सामोरे जावे लागणार आहे.
वेतनवाढीच्या प्रलंबित मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील बँकांनी संपाची हाक दिली होती. त्यात औरंगाबाद शहरातील २६ बँकांच्या १४० शाखांचे सुमारे दीड हजार कर्मचारी सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने एसबीआय, एसबीएच, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ पटियाला, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक, पंजाब नॅशनल बँकेचा समावेश होता. यामुळे बँकांच्या कार्यालयात शुकशुकाट होता. दररोज या बँकांकडून ७०० कोटींचे व्यवहार पूर्ण होतात. ते ठप्प झाले.
४९ हजार रुपये अडकले
अमरप्रीतजवळील एसबीआयच्या सीडीएममध्ये पैसे टाकत असताना मोहंमद जुबेर पीर मोहंमद यांचे ४९ हजार रुपये अडकले. बरीच खटपट करूनही त्यांना पैसे भरल्याची पावती मिळाली नाही. पैसे खात्यात जमा झाले की नाही, हे कळू शकले नाही. आता उद्या बँकेत विचारणा करूनच पुढील व्यवहार करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सामान्य नागरिकांची झाली अडचण
बीड बायपास परिसरातील प्रवीण वाघमारेंना दहा हजार रुपये तातडीने भरणे आवश्यक होते. मात्र, सिडको येथील एसबीआयच्या शाखेत गेल्यानंतर तेथील मशीन बंद होती. त्यानंतर ते अमरप्रीतजवळील एसबीआयच्या बँकेत आले. तेथेही मशीन बंद असल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. बँकेच्या सुरक्षारक्षकाने रेल्वेस्टेशन परिसरातील मशीन चालू असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी तेथे जाऊन पैसे भरले. संप करायचा, तर बाकीच्या यंत्रणा तरी सुरळीत ठेवल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.