आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • United Spirit Company Worker Suicide Case Aurangabad

कामगाराच्या आत्महत्येनंतर युनायटेड स्पिरिटची तोडफोड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील युनायटेड स्पिरिट या मद्यनिर्मिती कंपनीच्या निलंबित कर्मचा-याने आत्महत्या केल्याने संतप्त नातलग आणि कामगारांनी कंपनीची प्रचंड तोडफोड केली. कंपनीच्या प्रवेशद्वारापासून कामगारांचा जमाव तोडफोड करीत महाव्यवस्थापकाच्या केबिनपर्यंत पोहोचला. त्यामुळे कंपनीत काचांचा खच पडला होता. हा गोंधळ सुमारे चार तास सुरू होता. ही घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. मृत कामगाराच्या नातलगांना नियमानुसार संपूर्ण देयके देण्याचे लेखी आश्वासन व्यवस्थापनाने दिल्यानंतर मृतदेह कंपनीबाहेर काढण्यात आला.
कैलास जनार्दन खंडागळे (38, रा. अशोकनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे. खंडागळे हे 1998 पासून युनायटेड स्पिरिट कंपनीत कार्यरत होते. 2001 मध्ये त्यांना कायम करण्यात आले होते. सप्टेंबर 2011 मध्ये चोरीचा आरोप ठेवण्यात येऊन त्यांना निलंबित करण्यात आले होते. सोमवारी रात्री घरात कोणी नसताना खंडागळे यांनी गळफास घेतला. मंगळवारी नातलगांनी खंडागळेंचा मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहासह थेट कंपनी गाठली. याच वेळी महाव्यवस्थापक संजय गुप्ता कंपनीत दाखल झाले. मृतदेह पाहून गुप्ता यांनी ‘हा तर चोर खंडागळे आहे,’ असे उद्गार काढताच जमाव भडकला. जमावाने मुख्य कार्यालयाच्या काचा, संगणक आणि टेबल-खुर्च्यांची तोडफोड केली. ही घटना सकाळी घडल्याने आणि पुरेसा फौजफाटा नसल्याने जमावाला रोखण्यात पोलिसांना अपयश आले. त्यानंतर मोठा पोलिस फौजफाटा कंपनीत दाखल झाला होता.