आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्राध्यापक, उपप्राचार्य, कर्मचाऱ्यांना कामासाठीच विद्यापीठात प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्राध्यापक,उपप्राचार्य, कर्मचाऱ्यांच्या थेट विद्यापीठ भेटीला आता चाप बसण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील यांनी या संदर्भात (६ ऑगस्ट) आदेश जारी केले आहे. प्राचार्यांच्या परवानगीशिवाय येणाऱ्यांना प्रवेश नाकारू. तथापि, कुणी आलेच तर प्राचार्यांनाच जबाबदार धरले जाईल. या निर्णयाला विरोध करणाऱ्या संघटनांची न्यास नोंदणीही तपासू अशी रोख ठोक भूमिका डॉ. पाटील यांनी घेतली आहे.
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बीसीयूडी संचालक आणि कुलसचिवाचे कार्यभार बदलल्यानंतर प्रशासनात काही सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. प्राध्यापक, कर्मचारी संघटनांच्या आडून विद्यापीठ प्रशासनाला कायम वेठीस धरणाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने आता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. कुलगुरूदेखील त्यासाठी अनुकूल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच यापुढे प्राध्यापक, कर्मचारी, उपप्राचार्यांना विद्यापीठात थेट काम घेऊन येता येणार नाही.

अभ्यागत प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना प्राचार्यांचे शिफारसपत्र, स्वत:चे ओळखत्र आणि कामाचे विवरणपत्र दाखवल्याशिवाय प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन किंवा इतर कुठल्याही विभागात प्रवेश देण्यात येणार नाही. यासंदर्भात डॉ. पाटील यांनी कुलगुरूंच्या संमतीने ऑगस्ट रोजी परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकाची प्रत प्रत्येक महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठवण्यात आली आहे. शिवाय कुलगुरूंच्या उपस्थितीत लवकरच एक प्राचार्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्या वेळी प्राचार्यांना नवीन बदलाची माहिती करून देण्यात येणार आहे. यापुढे महाविद्यालयांचे कर्मचारी, प्राध्यापक अथवा उपप्राचार्य संस्थेच्या किंवा खासगी कामासाठी विद्यापीठात येणार असल्यास प्राचार्यांची संमती दाखवणे आवश्यक आहे. अन्यथा परवानगी शिवाय येणाऱ्यांना प्रवेश मज्जाव करण्यात येणार आहे. शिवाय महाविद्यालयांच्या परवानगीशिवाय आलेल्या प्रतिनिधींमुळे विद्यापीठात काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित प्राचार्यांनाच जबाबदार धरण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान काही संघटनांनी या परिपत्रकाला विरोध केला आहे. याविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पण अशा विरोधाला प्रशासन अजिबात घाबरणार नाही. विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्याला आमचे प्राधान्य असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यापीठ प्रशासनावर दबाव आणून स्वत:चे इप्सित साध्य करणाऱ्या संघटनांच्या नेत्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. आगामी काळात अशा संघटनांच्या नोंदणी तपासण्यात येणार आहे. प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी संघटनांची नोंदणी असली तरच विद्यापीठ प्रशासन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. अन्यथा त्यांची दखल घेणार नसल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

उस्मानाबाद उपकेंद्राच्या वर्धापनदिनी म्हणजेच १६ ऑगस्ट रोजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेत व्यवस्थापन परिषदेच्या पदसिद्ध सदस्यांची बैठक झाली. त्या वेळी अशाच आशयचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन आदी ठिकाणी पास दाखवल्याशिवाय परवानगी देण्यात येणार नाही. कामाचे स्वरूप, त्यासंदर्भातील कागदपत्र दाखवल्याशिवाय गेटपासच दिला जाणार नाही. शिवाय ज्याचे काम आहे, त्यांना एकट्यालाच प्रवेशपत्र दिले जाईल. एकाच्या कामासाठी झुंडीने यापुढे प्रवेश दिला जाणार नसल्याचा हा ठराव असून त्याची अंमलबजावणी करणे आता विद्यापीठासमोर मोठे आव्हान आहे.
बातम्या आणखी आहेत...