आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"फी'सह विद्यापीठाचे शुल्क ऑनलाइन भरण्याची सोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॅश काउंटरवर तासन््तास उभे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना खुशखबर आहे...! परीक्षा शुल्क, शैक्षणिक आणि वसतिगृहासह विविध प्रकारचे शुल्क भरण्यासाठी त्यांना विद्यापीठात येण्याची गरजच भासणार नाही. विद्यार्थ्यांना काॅर्पोरेट बँकेच्या मार्फत विद्यापीठ ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. १६ ऑगस्टच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार असून सप्टेंबरपासून प्रत्यक्षात सेवा सुरू होणार आहे.
विद्यापीठ स्थापनेपासून ते आतापर्यंत प्रशासकीय इमारतीच्या शेजारी विद्यार्थी आणि पालकांच्या कायम रांगा लागलेल्या असायच्या. परीक्षा काळातील अभ्यास प्रॅक्टिकल सोडून कॅश काउंटरवर तासनतास उभे राहावे लागत होते. मात्र, सप्टेंबरपासून हे चित्र दिसणार नाही. कारण येस बँक, अॅक्सिस बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी २९ जुलैच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, वित्त लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन यांच्यासह सदस्यांसमोर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन (पीपीटी) सादर केले आहे. तिन्हीपैकी एका बँकेची सुविधा विद्यापीठ घेणार आहे. त्यामुळे परीक्षा शुल्क, शैक्षणिक आणि वसतिगृह शुल्कासह इतर कुठल्याही प्रकारचे शुल्क बँकेमार्फत थेट ऑनलाइन भरता येणार आहे. त्यामुळे पब्लिकेशन आणि कॅश काउंटरसमोर आता रांगा आता दिसणार नाहीत. तिन्ही बँका मोफत सुविधा पुरवणार असून ज्यांची प्रभावी सुविधा असणार आहे, त्यांच्याकडे पुढील काम सोपवण्यात येणार आहे. युरोप दौऱ्यावरून सदस्य आल्यानंतर १६ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद येथे व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार असून त्यामध्ये बँकेचे नाव ठरवण्यात येणार आहे.
विभागाला स्मार्ट करू
संलग्नित महाविद्यालयांना ऑनलाइन शुल्क भरण्याची सक्ती केली. विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन सुविधा दिल्यास वित्त लेखा विभाग स्मार्ट होईल. डॉ.सय्यद अझरुद्दीन, लेखाधिकारी
विद्यापीठ संकेतस्थळाशी जोडणार
विद्यापीठाच्यासंकेतस्थळावर विविध अभ्यासक्रम आणि त्यांच्या शुल्काचा उल्लेख असेल. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच शुल्क भरण्याची लिंक उपलब्ध होईल. त्यावरून विद्यापीठाच्या अकाउंटमध्ये भरता येतील. सचिन डहाळे, उपाध्यक्ष,येस बँक
आर्थिक गैरव्यवहारावर अंकुश बसणार
शुल्कऑनलाइन झाल्यामुळे सर्वात मोठा फायदा म्हणजे गैरव्यवहारावर अंकुश बसणार आहे. त्याशिवाय मनुष्यबळ कमी होऊन पेपरलेस काम करता येईल. विद्यार्थी कर्मचाऱ्यांच्या वेळेची बचत पर्यावरणाचे संवर्धन राखता येईल. त्याशिवाय विद्यापीठ प्रशासनाला कुणी शुल्क भरले, कुणी भरले नाही, याचा दैनंदिन डाटा उपलब्ध होणार आहे.
अकाउंट विभागावरील ताण कमी होईल
अकाउंटविभागात एकूण ८३ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त २१ जण कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांवरील ताण आणि संख्या लक्षात घेता, वित्त लेखा विभाग ११ अस्थायी कर्मचाऱ्यांकडून गरज भागवून घेत आहे. वास्तविक पाहता अस्थायी कर्मचारी अशा कामात ठेवू नये, पण अपरिहार्यता आहे. ऑनलाइन सेवा सुरू झाल्यास किमान ते १० कर्मचाऱ्यांना या कामापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. त्यांना इतर दुसऱ्या कामात गुंतवून ठेवता येईल.