औरंगाबाद- राज्यशासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचा सन २०१४-१५ चा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला घोषित झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक पुरस्काराचा सन्मानही विद्यापीठाचेच समन्वयक डॉ. राजेश करपे यांना मिळाला आहे. त्याशिवाय उत्कृष्ट स्वयंसेवक आणि उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कारांचे मानकरीदेखील संलग्नित महाविद्यालयांतील व्यक्ती ठरले आहेत.
कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांनी सोमवारी (दि.२७) पत्रकार परिषदेत माहिती देण्यापूर्वी डॉ. करपे यांचा सत्कार केला. कुलगुरू म्हणाले, केंद्र शासनाने महात्मा गांधी जन्मशताब्दीनिमित्त १९६९ मध्ये राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. योजनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात १९९३-९४ मध्ये
रासेयोअंतर्गत पुरस्कार देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. सन २००७-०८ मध्ये तत्कालीन विद्यापीठ समन्वयक डॉ. धनंजय माने यांना हा पुरस्कार मिळाला होता. चालू वर्षाच्या पुरस्काराची घोषणा २७ जुलै रोजी करण्यात आली. सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी येथील विद्यापीठाला हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट समन्वयक हा पुरस्कार डॉ. राजेश करपे यांना (स्मृतिचिन्ह १० हजार रुपये रोख) देण्यात येणार आहे. डॉ. पांडुरंग कल्याणकर (कार्यक्रमाधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र) ज्योती सिद्धार्थ मलवार (सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक) यांनाही पुरस्कार घोषित झाले आहेत. नि:स्वार्थ भावनेने निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे त्यांच्या नि:स्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या हेतूने राज्य शासनाने हे दिले असल्याचे कुलगुरूंनी म्हटले असून आपण स्वत: सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कारासाठी जिल्हा समन्वयक डॉ.शरद गावंडे, डॉ. टी.आर.पाटील, डॉ. संदीप पाटील आदींसह बी.बी.वाघ, प्रेमचंद सलामपुरे, डॉ. राम चव्हाण, श्याम बन्सवाल नवनाथ सदाफुले यांचे सहकार्य लाभले, असे डॉ.करपे म्हणाले. ऑगस्ट महिन्यात पुरस्कार वितरण होणार असून आता विद्यापीठ राष्ट्रीय पुरस्कारांच्या स्पर्धेतही दाखल झाले आहे.