आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागाने "टी क्लब' जपला ५३ वर्षांपासून!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उत्साहाने‘टी क्लब’ कुणीही सुरू करतो, पण सातत्य नसल्याने दोन ते तीन बैठकांतच गुंडाळले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी त्यांचा ‘टी क्लब’ ५३ वर्षांपासून जपला आणि वाढवला.
सकारात्मक चर्चेतून सतत नावीन्यपूर्ण उपक्रम, एकमेकांना लाखोंची मदत आणि महत्त्वाचे म्हणजे सुखदु:खाच्या गुजगोष्टींमुळे ‘क्लब’ला सहसा कुणालाही दांडी मारण्याची इच्छा होत नाही.
जि. प.च्या सध्याच्या मुख्यालयात २३ ऑगस्ट १९५८ रोजी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर वर्षभरातच म्हणजे १९५९मध्ये प्राणिशास्त्र विभागाची स्थापना करण्यात आली होती. विभागाचे पहिले प्रमुख प्रोफेसर डॉ. मेहंदी अली यांनी १९६२ मध्ये ‘टी क्लब’ सुरू केला. त्यानंतर विद्यापीठाच्या सुट्यांचा अपवाद वगळता आतापर्यंत दररोज ‘टी क्लब’मध्ये गप्पाष्टके रंगताहेत. कालांतराने प्रोफेसर डॉ. नागभूषणम यांच्या दोन दशकांच्या विभागप्रमुखपदाच्या कार्यकाळात तर रचनात्मक कार्य घडत गेले. १९७२ ते १९९१ पर्यंतच्या २१ वर्षांत शैक्षणिक विकास संशोधनाच्या गुणवत्तेवर चर्चा होऊन त्या प्रत्यक्षात उतरत गेल्या.
यूजीसीचा स्पेशल अॅसिस्टंट प्रोग्राम (सॅप)असो वा डीएसटीच्या कुठल्याही योजनेत विभागाने हिरीरीने भाग घेतला आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांची विभागात २४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्य:स्थितीत १६ जण कार्यरत आहेत. दुपारचा दीड वाजला की सर्वजण चुकता कॉन्फरन्स हॉलमध्ये जमतात. ‘टी क्लब’साठी विद्यापीठाचे पैसे वापरता सर्व खर्च वर्गणीतून केला जातो. त्याचा हिशेबही ठेवण्यात आला आहे.

यांची नियमित उपस्थिती
विभागप्रमुखडॉ. चंद्रशेखर हिवरे, प्राध्यापक डॉ. यशवंत खिल्लारे, डॉ. एस. पी. झांबरे, डॉ. मीना पाटील, डॉ. दौलत सोनवणे, डॉ. कासार्ला रवींद्र रेड्डी, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. स्मिता सोनवणे, डॉ. राम चव्हाण, डॉ. सुनीता बोर्डे, डॉ. सतीश मोकाशे आदींची टी क्लबला नियमित उपस्थिती असते.

‘टी क्लब’च्या चर्चेतूनच २००० मध्ये टीचर-स्टुडंट लायब्ररीची स्थापना करण्यात आली. दरमहिन्याला वर्गणी करून एक लाखांची रक्कम उभी केली जाते. चिठ्ठी काढून एखाद्या प्राध्यापकाला रक्कम बिनव्याजी वापरण्यासाठी देतात. त्यातून अनेकांची गरज भागली असून छोट्या मोठ्या कामांसाठी बँकेचे कर्ज काढण्याची वेळ आली नाही. दोन वेळ मुलांच्या अॅडमिशनसाठी पैसे कामी आल्याचे डॉ. भालचंद्र वायकर यांनी सांगितले. विभागातील कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ‘टी क्लब’मध्ये त्याचा कौटुंबिक सत्कार करून भेटवस्तू दिली जाते. विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर हिवरे यांनी पुढील वर्षीपासून ‘एक झाड एक विद्यार्थी’ अशी दत्तक योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. क्लबच्या मेंबरपैकी कुणाला पुरस्कार मिळाल्यास त्यांचाही गौरव केला जातो.
बातम्या आणखी आहेत...