आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त दिवस चालणार ‘ओपन डे’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २३ ऑगस्ट रोजी ५८ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने रविवारपासून तीन दिवस (२१, २२, २३ ऑगस्ट) ‘ओपन डे’ आयोजित करण्यात आला आहे. यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी शनिवारी ‘दिव्य मराठी’ला दिली.
तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी आयआयटीच्या धर्तीवर पाच वर्षांपूर्वी दोनदिवसीय ‘ओपन डे’ सुरू केला होता. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी मात्र २०१४ पासून ओपन डे तीन दिवसांचा केला आहे. मागच्या वर्षीदेखील तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यंदा पाच जणांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रंथ प्रदर्शन, चित्रपट प्रदर्शन, व्यंगचित्र प्रदर्शनासह विविध कार्यक्रम होणार आहेत. ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात ‘चक दे इंडिया, मेरी कोम, मुक्ता, लज्जा, नितळ, ‘डोर’ या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार असल्याचे संचालक डॉ. प्रतिभा अहिरे यांनी सांगितले. वृत्तपत्रविद्या जनसंवाद विभागात आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन, ग्रीन युनिव्हर्सिटी, फोटो वॉक कॉम्पिटिशन, टीव्ही प्रॉडक्शन कार्यशाळा, कम्युनिकेशन स्किल कार्यशाळा आदी कार्यक्रम होणार आहेत.

२२ ते २५ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात २० हजारांची पारितोषिके देण्यात येतील, असे डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले. ललित कला विभागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे विभागप्रमुख डॉ. शिरीष अंबेकर म्हणाले. त्याशिवाय सर्वच विभागांमध्ये माजी विद्यार्थ्यांचे मेळावे, प्रदर्शने, चर्चासत्रे आयोजित केली आहेत. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांनी केले आहे.

कामकाज असल्याचे ऐनवेळेवर सांगितले
रविवारी ओपन डेनिमित्त सर्व विभाग सुरू ठेवण्याचे ऐनवेळेवर ठरवल्याचा आरोप बामुटाचे माजी अध्यक्ष डॉ. काशीनाथ रणवीर यांनी केला आहे. शनिवारी एसएमएस करून रविवारची सुटी रद्द करण्याचेे सांगण्यात आले. नियोजन आधीच का केले नाही, असा सवाल डॉ. रणवीर यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...