आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निनावी फोनमुळे गारखेड्यातील महिलेच्या खुनाला वाचा फुटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मृत ताहेरा
औरंगाबाद - आईघरात नसल्याने मुले तिचा शोध घेत फिरत होती. ती सापडत नसल्याने दोघी बहिणी आणि भावाचे प्राण कंठाला आले. तेवढ्यात अज्ञात व्यक्तीने त्यांच्या चुलत भावाच्या मोबाइलवर फोन करून तिचा खून झाल्याचे सांगितले आणि या भावंडांनी हंबरडा फोडला. राहत्या घराशेजारीच असलेल्या दुसऱ्या घराच्या तळमजल्यात तिचा मृतदेह सापडला. संपत्तीच्या वादातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत महिलेच्या नणंदोईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ताहेरा अजीज पठाण असे मृत महिलेचे, तर नय्यूम यासिन शेख असे आरोपीचे नाव आहे.

ताहेरा पठाण मुलगा जमीर आणि दोन मुलींसोबत भारतनगर भागात राहत होत्या. त्यांचे पती अजीज पठाण यांचा दोन वर्षांपूर्वी काविळीमुळे मृत्यू झाला. ते बांधकाम व्यावसायिक होते. अजीज यांनी भारतनगर भागात राहत्या घरासह एक दोन मजली इमारत बांधली होती. या मालमत्तेची आजची किंमत एक कोटीपेक्षा जास्त आहे.

नणंदोईने खून केल्याचा संशय
ताहिरा यांच्या शेजारीच त्यांची नणंद नणंदोई राहतो. अजीज यांच्या मृत्यूनंतर या मालमत्तेवर नणंदोई नय्युम यासिन शेख याचा डोळा होता. तो दुसऱ्या इमारतीत भाडेकरूंनाही राहू देत नसे, असे जमीरने तक्रारीत म्हटले आहे. खुनाची घटना उघड झाल्यापासून तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पाच तास केली शोधाशोध : ताहेरारोज सकाळी दुसऱ्या इमारतीच्या साफसफाईसाठी जात होत्या. शनिवारी सकाळी त्या या इमारतीत गेल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या परतल्या नाहीत म्हणून जमीर दोघी बहिणी आईला शोधण्यासाठी निघाले. जमीरने शेजारी राहणाऱ्या मुन्नाला फोन केला असता त्याने दरवाजा उघडला. मात्र, आतील सर्व खोल्यांचे दरवाजे हे बाहेरून लावलेले असल्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोध सुरू केला. दुपारी बाराच्या सुमारास जमीरच्या चुलत भावाच्या मोबाइलवर निनावी फोन आला. त्याने ज्या इमारतीत ताहेरा गेल्या होत्या त्याच इमारतीच्या तळमजल्यावर ताहेरा असल्याचे सांगितले. जमीर तिकडे धावत गेला असता आई खाली पडलेली होती. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नाथा जाधव, उपनिरीक्षक कल्याण शेळके, हारुण शेख घटनास्थळी पोहोचले.