आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनापरवाना होर्डिंग्ज लावणार्‍या रांजणगावच्या दोघांवर गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज-वाळूज महानगरात अवैध होर्डिंग्ज, बॅनर्स लावल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सुरेश साहेबराव सोनवणे आणि राजू तुकाराम जाधव (दोघेही रा. वडगाव कोल्हाटी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘दिव्य मराठी’ने 19 जानेवारीच्या अंकात ‘होर्डिंग्ज पुन्हा झळकू लागले’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मुं.पो.का.च्या कलम 131/2 डीबीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी शहरात काही महिन्यांपूर्वी अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर लावणार्‍यांवर कारवाई केली. याच धर्तीवर वाळूज व वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केल्याने वाळूज महानगरातील चौकांनी कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मोकळा श्वास घेतला होता. मात्र, पुन्हा एकदा प्रसिद्धीसाठी परिसरातील चौकांत अनधिकृत बॅनर्स व होर्डिंग्ज झळकू लागले. ही बाब ‘दिव्य मराठी’ने समोर आणल्यानंतर पोलिस निरीक्षक किशोर नवले यांच्या आदेशानुसार पोलिस हेडकॉन्स्टेबल शेख सलीम व जगदीश खंडाळकर यांनी शुभेच्छापर होर्डिंग्ज लावणार्‍यांवर मंगळवारी (21 जानेवारी) सायंकाळी गुन्हा दाखल केला. त्यामुळे परिसरात इतरत्र अवैध होर्डिंग्ज, बॅनर्स लावणार्‍यांवर चांगलाच वचक निर्माण होणार आहे. अनधिकृत होर्डिंग्ज किंवा बॅनर्स लावणार्‍यांवर या नंतरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी दिला आहे.