आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unseasonal Rain Marathwada More Likely Over Next 2 Days

मराठवाड्यात अवकाळीचा कहर, गहू, हरभरा पिकांचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेडमध्ये शनिवारपासून ढगाळ वातावरण असून काल रात्रीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोलीतही पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हिंगोलीत तर पावसाळ्यासारखे वातावरण दिवसभर असल्याने सूर्यदर्शनही झाले नाही. या पावसामुळे गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले असून आंब्याचा मोहर गळाल्यानेही मोठे नुकसान झाले आहे.
नांदेड - जिल्ह्याच्या सर्व भागांत शनिवारपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. हिमायतनगर, हदगाव, भोकर तालुक्याच्या काही भागांत वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्याने गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पाऊस येत आहे. अजून दोन दिवस हेच वातावरण कायम राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी रविवारी सांगितले.

शनिवारपासून जिल्ह्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली. शहरात शनिवारी रात्री रिमझिम पावसाने हजेरी लावली. रविवारी तर सकाळपासून ढगाळ वातावरण व अधूनमधून रिमझिम सुरू होती. त्यामुळे सूर्यदर्शनही दुर्मिळ झाले. हिमायतनगर, हदगाव, भोकर तालुक्यात वादळी पावसामुळे गहू, हरभरा या रब्बी पिकांचे नुकसान झाले, तर पावसाने आंब्याचा मोहोरही मोठ्या प्रमाणात गळून पडला.

"दिव्य मराठी'चे भाकीत खरे ठरले
या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वादळी पाऊस, गारपीट होईल, असे वृत्त "दिव्य मराठी'ने २२ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात दिले. या वृत्तानुसार जानेवारी व फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली.

दोन दिवस पावसाळी वातावरण
पश्चिमी विक्षोपाच्या वार्‍याची तीव्रता अजूनही कमी न झाल्यामुळे अरबी समुद्र, मराठवाडा, उत्तर, मध्य महाराष्ट्रासह सर्व उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे शनिवारपासून वादळी पाऊस होत आहे. अजून दोन दिवस हेच वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उन्हाळा अजून लांबणार आहे. उन्हाळा कमी राहणार असल्याने या वर्षीही पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याचे एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

बीडमध्ये जनजीवन विस्कळीत
बीड - जिल्ह्यात रविवारी दिवसभर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा,ज्वारी, गहू, हरभरा व द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. बीड शहरासह सर्वच तालुक्यांत शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावली. शिरूर, वडवणी, आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, धारूर, परळी, अंबाजोगाई, केज या तालुक्यांतही दिवसभर पावसाची रिमझिम सुरूच होती.
रिमझिमने लातूरकर गारठले

लातूर जिल्ह्यात रविवारी पहाटे अवकाळी पावसाचे आगमन झाले. तो रिमझिम रूपात अल्पकाळ बरसला. जोराचे वारे असल्याने आंब्याचा मोहर व कागदी लिंबाच्या बागांना फटका बसला. शहर व जिल्ह्याचे तापमान २१ ते २३ अंश असे राहिले. वातावरणात गारठा व रविवार असल्याने अनेकांनी घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे रस्त्यावरही नेहमीप्रमाणे गजबज दिसून आली नाही. सध्या ज्वारी, गहू व हरभरा काढणीच्या अवस्थेत आहे. कणसे, लोंब्या व घाटे भिजल्याने या पिकाच्या धान्याची गुणवत्ता घसरणार असल्याची भीती शेतकर्‍यांना आहे. ज्वारी काळी, गहू फिक्कट पांढरा पडू शकतो. शिवाय द्राक्ष घडांमध्ये पाणी गेल्याने त्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यात ७.८६ मिमी नोंद
जालना जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले, तर रविवारी विविध ठिकाणी संततधार सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ७.८६ मिमी पाऊस झाला. त्यात परतूर तालुक्यात सर्वाधिक १३.२० मिमी तर जालना तालुक्यात १०.२५, भोकरदन तालुक्यात १०.२० मिमी पाऊस झाला. मंठ्यात मात्र पावसाचा जोर कमी होता. तेथे केवळ ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना फटका बसला आहे.

उस्मानाबादेत फळबागांना फटका
उस्मानाबाद जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना फटका बसला. शहरात ४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. काही भागांत रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर रात्री ११.३० वाजेच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागांतही पाच मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. तसेच पहाटेपासून रिमझिम सुरू होती. नागरिकांना दुपारी १२ वाजेपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर अधूनमधून सरी कोसळत होत्या.