आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UPA Work Damaged Nation's Financial Condition; Yashwant Sinha Allegation

यूपीएच्या कारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली; यशवंत सिन्हा यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - यूपीए सरकारच्या कारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून परिस्थिती चिंताजनक आहे. अर्थव्यवस्था लवकर सुधारेल अशी कोणतीही चिन्हे नाहीत. कहर म्हणजे सरकारने आता चिंता करणेही सोडून दिले आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत यूपीए सरकारवर कोरडे ओढले.


संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले यशवंत सिन्हा समितीच्या बैठकीसाठी रविवारी सायंकाळी औरंगाबादेत आले. त्यानंतर त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला.


1991 पेक्षा वाईट स्थिती : अर्थव्यवस्थेची आजची परिस्थिती 1991 पेक्षा वाईट आहे. आपल्याकडे विदेशी चलनाची बख्खळ गंगाजळी आहे. या एकाच गोष्टीमुळे आपण आतापर्यंत तग धरू शकलो आहोत. आता 10 अब्ज, 8 अब्ज गंगाजळी घटली तरी फारसा ताण जाणवला नाही, पण 91 मध्ये गंगाजळी खूपच कमी होती. खराब अर्थव्यवस्था असली तरी जनतेला महागाई, बेरोजगारी या दोन प्रश्नांचा थेट त्रास होतो आहे.
आज नाशिक दौरा : संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या दौ-याबाबत ते म्हणाले की, सरकारची आर्थिक धोरणे कशी राबवली जात आहे याचा आढावा घेण्यासाठी छोट्या शहरांत ही समिती जात असते. त्या आधारे विविध धोरणांबाबत सूचना समिती करीत असते. हा दौरा त्याचाच एक भाग आहे. सोमवारी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला समिती भेट देईल. मंगळवारी औरंगाबादेत महाराष्‍ट्र बँकेच्या अधिका-यांसोबत बैठक होणार असून त्यात बँकिंगसंदर्भातील
सरकारची धोरणे कशी राबवली जात आहेत, याचा आढावा घेतला जाईल. समितीत खासदार चंद्रकांत खैरे, भावना गवळी, निशिकांत दुबे, भारत हरी मेहता यांचा समावेश आहे.


सरकारने चिंता करणे सोडले
सिन्हा म्हणाले की, सरकारचेच आकडे सांगतात की, एनडीएच्या 1999-2004 या राजवटीत नियोजनाच्या 6 कोटी संधी उपलब्ध झाल्या होत्या. यूपीए 1 च्या काळात अवघ्या 27 लाख, पण याचा फार गवगवा झाला नाही. हे सरकारी आकडेच खालावलेल्या अर्थव्यवस्थेचे चित्र दर्शवतात. सरकार अर्थव्यवस्था सुधारण्याचे कामच करताना दिसत नाही. वायफळ खर्च वाढत चालला आहे. खरे सांगायचे तर सरकारने आता चिंता करणेदेखील सोडले आहे.


अर्थव्यवस्था सुधारणे कठीण
अर्थव्यवस्था नजीकच्या काळात सुधारेल असे बिलकूल वाटत नाही, असे सांगत सिन्हा म्हणाले की, यूपीए 2 च्या चार वर्षांत दरवर्षी ग्राहक निर्देशांक दोन आकड्यांतच राहिला. हे सरकारचे अपयश आहे. त्यामुळे बिघडत चाललेली अर्थव्यवस्था लगेच सुधारण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.