आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1200 व्यवहार तपासणार, UPI घोटाळ्यातील गुन्हेगारांनी केला मित्र आणि नातेवाइकांच्या माेबाइलचा वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यूपीआय घोटाळ्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी बँकेने दिलेल्या संशयित १२०० व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे. नेमक्या कुठल्या खात्यामधून कोणाच्या खात्यात पैसे गेले ही साखळी तपासली जाणार आहे. प्रथमदर्शनी विविध ६२ खात्यांतून संशयित व्यवहार झाले असून ३० खात्यांवरून पैसे काढण्यात आले असल्याचे समोर आले आहे. या तपासाला गती देण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. 
 
शहरातील मुकुंदवाडी, सिडको आणि वाळूज या ठाण्यांत याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लोकांना फसवून स्वत:च्या खात्यावर पैसे टाकणारी टोळी वेगवेगळी असू शकते. या तिन्ही भागांतील आरोपींचा एकमेकांशी संबंध नसल्याचे दिसून येत आहे. व्यवहार झालेल्या खात्यांची बारकाईने तपासणी केल्यानंतर या पाठीमागची साखळी समोर येईल. मुकुंदवाडी येथे सर्वात पहिल्यांदा या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यातील आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो फरार आहे. 
 
फक्त बँक ऑफ महाराष्ट्रच का? 
बँकऑफ महाराष्ट्रच्या खातेदारांसोबतच हा प्रकार का घडला याचा तपास केला जात आहे. या आरोपींनी इतर बँकेच्या खातेदारांनादेखील अशा प्रकारे गंडा घातला आहे का याचाही शोध सुरू आहे. प्रथमदर्शनी बँक किंवा यूपीआय अॅपच्या सुरक्षेत काही त्रुटी राहिल्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. खात्यात रक्कम नसतानादेखील एक लाखापर्यंत रक्कम डेबिट झाल्याचे प्रकार घडले आहेत. हा प्रकार शहरातील सुमारे सहाशे खातेधारकांसोबत घडला असून यातील सुमारे ४०० खाती बँक ऑफ महाराष्ट्रने होल्ड केली आहेत. विशेष म्हणजे चलन बदलीनंतर मागील तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. ज्या खातेदारांनी डेबिट झालेली रक्कम पुन्हा खात्यात भरली त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नसल्याचे बँक व्यवस्थापनाने पोलिसांसमोर स्पष्ट केले आहे. 
 
पोलिसांचा कयास 
गुन्हेगार सतत नवीन मोबाइलच्या शोधात असत. मोबाइल मिळताच त्याचा बँकेच्या व्यवहारासाठी वापर करत. या घोटाळ्यात बँकांचे कर्मचारी सहभागी असल्याचा कयास पाेलिसांनी व्यक्त केला. 
 
मोबाइल तुमची ओळख 
सध्या बहुतांश व्यवहार डिजिटाइज्ड झाले असून तुमची ओळख म्हणून तुमचा मोबाइल नंबर वापरला जातो. आपला मोबाइल दुसऱ्याच्या हाती देणे म्हणजे आपल्या तिजाेरीची किल्ली दुसऱ्याला देण्यासारखे आहे. त्यामुळे कुठलाही व्यवहार करताना आपला मोबाइल नंबर आणि मोबाइल एखाद्या पासवर्डसारखा जपून वापरायला हवा. यूपीआय प्रकरणात अशा प्रकारेच मोबाइलचा वापर करून गंडा घातल्याचे समोर आले आहे. उन्मेषथिटे, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर सेल 
 
आई-वडील आजारी आहेत, तुझ्या मोबाइलवर पैसे मागवू का? 
यातील बहुतांश आरोपींनी दुसऱ्यांचे सिमकार्ड वापरून आपल्या मोबाइलमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे अॅप डाऊनलोड केले. माझे आई-वडील आजारी आहेत. माझे खाते नाही, तुझ्या अकाउंटमध्ये पैसे मागवू का? असे म्हणून मोबाइल घ्यायचे आणि अर्ध्या तासानंतर मोबाइलचे सिमकार्ड परत करायचे. 
बातम्या आणखी आहेत...