आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Urdu Magazine Bacche Ki Duniya Record Break Sale At Aurangabad

‘बच्चें की दुनिया’: मुलांचे उर्दू मासिक; औरंगाबादेत 50 हजार वाचक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- टीव्ही, इंटरनेट आणि कॉम्प्युटर गेम्समुळे मुलांचे वाचन कमी झाले, अशी चिंता सातत्याने व्यक्त केली जाते. पण दिल्लीहून प्रकाशित होणारे उर्दूतील ‘बच्चों की दुनिया’ मासिकाने औरंगाबादेत 50 हजारांवर वाचक जमवून ही चिंता व्यर्थ असल्याचे दाखवून दिले आहे. या मासिकाच्या देशभरातील सर्वाधिक विक्रीचा असा विक्रम औरंगाबादेत नोंदला गेला.

मुस्लिम समाजात वाचन संस्कृती रुजावी यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत उच्च शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेने ‘बच्चों की दुनिया’ हे उर्दू मासिक काढले आहे. रंगीत गुळगुळीत कागदावरील छपाई, आकर्षक छायाचित्रे, विज्ञान-तंत्रज्ञान, स्वातंत्र्यलढा, वैज्ञानिक आणि महापुरुषांच्या गौरवगाथा, भारतीय सणवार, चांगल्या सवयी, नागरिकांची कर्तव्ये आणि देश-विदेशातील ताजा घडामोडींची माहिती यात असते. सोबतीला वॉल्ट डिस्नेची काटरून्स, चित्र रंगवा, कोडी, जोक्स अशी मेजवाणी येथे आहे. एका अंकाचे मूल्य 10 रुपये तर वार्षिक वर्गणी अवघी 100 रुपये आहे.

अशी झाली नोंदणी
मुस्लिम स्कॉलर आणि ऑल महाराष्ट्र मुस्लिम तेली समाजाचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम बेग नदवी दिल्लीत मुस्लिम प्रकाशकांच्या बैठकीला गेले होते. तेव्हा मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी मासिकाची माहिती दिली. प्रकाशकांना त्याची नोंदणी करण्याची विनंती केली. इतर लोक 50-100 अंक नोंदवत असतांना नदवी यांनी बैठकीतच 2 हजार अंक नोंदवले. परतल्यानंतर त्यांनी शहरातील शाळांत फिरून नोंदणी सुरू केली. 8 महिन्यांत 50 हजारावर वर्गणीदार करत ते देशात पहिले आले. जुलैमध्ये 10 हजार नोंदणी झाली. सप्टेंबरमध्ये ही संख्या 18 हजारावर गेली. तर नोव्हेंबरमध्ये नोंदणीने 38 हजाराचा पल्ला गाठला. फेब्रुवारीत ती 50 हजारावर पोहचली आहे. दर महिन्याच्या 26 ते 30 तारखेच्या आत हे मासिक त्यांना घरपोच मिळते. येथून महिन्याच्या 7 तारखेपर्यंत याचे वितरण केले जाते. नदवी यांना राज्याची डिस्ट्रीब्युटरशिपही मिळाली आहे. त्यांनीच मालेगाव, नागपूर, परभणी, नांदेड, जळगाव, भिवंडी, मुंब्रा आणि सोलापूरातही पुस्तकांचे सभासद मिळवले आहेत.

अभ्यासात मदत होते
मासिकात गोष्टींसोबतच शाळेसाठी उपयुक्त माहितीचा खजिना आहे. यामुळे आम्हाला शाळेच्या अभ्यासात मदत होते. निबंध लेखन, भाषण करण्यासाठीही यातील माहिती उपयोगी ठरते. म्हणून आम्हाला हे पुस्तक आवडते.
- शेख नफिसा, चौसर, ज्योतीनगर

योग्य वयात वाचन संस्कार
आवडणारे साहित्य उपलब्ध करून दिले तर मुले वाचतात, असा आमचा अनुभव आहे. शालेय जीवनात वाचनाचे संस्कार झाले तर ते आयुष्यभर टिकतील. म्हणूनच जास्तीत जास्त सभासद करत आहोत. 50 हजार सभासदही कमीच आहेत. ते आणखी वाढायला हवेत.
-मिर्झा अब्दुल कय्युम बेग नदवी, वितरक, ‘बच्चें की दुनिया’ मासिक