आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध गझलकार बशर नवाज यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रसिद्ध उर्दू गझलकार बशर नवाज यांचे बुधवारी रात्री निधन झाले, ते 80 वर्षांचे होते. 18 ऑगस्ट 1935 रोजी औरंगाबाद येथे जन्मलेले बशर नवाज 60 च्या दशकात उर्दू साहित्यक्षितिजावर आपल्या गझलेमुळे चमकले. 1954 मध्ये त्यांनी गझल लेखनास सुरुवात केली होती. याच काळात औरंगाबादमध्ये झालेल्या अखिल भारतीय उर्दू मुशायऱ्यात त्यांनी पहिली गझल सादर केली. त्यानंतर अनेक नियकालिकात त्यांच्या गझल प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांचा पहिला संग्रह 'रायगाँ' 1972 मध्ये प्रकाशित झाला.
नया अदब-नये मसाइल हे त्यांचे समीक्षापर लेखांचे पुस्तक 1973 मध्ये प्रकाशित झाले. आजही त्याचा उर्दू साहित्यातील महत्त्वाचे पुस्तक म्हणून उल्लेख होतो. 1998 मध्ये त्यांचा 'अजनबी समंदर' हा संग्रह वाचकप्रिय झाला होता. बशर नवाज यांची गझल उत्तरोत्तर अधिक थेट आणि रसिकप्रिय झाली होती. 2008 मध्ये प्रकाशित झालेल्या 'करोगे याद तो' या गझलसंग्रहाने अनेक विक्रम मोडले होते. साहित्य अकादमीनेही त्यांचा गौरव केला होता.
यही चेहरा, वही आँखे, यही रंगत निकले
जब कोई ख्वाब तराशूँ तेरी मूरत निकले
इसी उम्मीद पे ख्वाबों से सजा ली निंद
कभी मुमकिन है कोई ख्वाब हकिकत निकले
जिंदगी भी किसी बाजार का मंजर जैसे
हमी भी माथे पे सजाए हुऐ किमत निकले
रसिक वाचकांच्या मनात दिर्घकाळ राहातील अशा गझल बशर नवाज यांनी दिल्या. दूरदर्शनवरुन प्रसारित झालेल्या अमिर खुसरो या मालिकेचे लेखन त्यांनी केले होते. याशिवाय आकाशवाणी आणि दुरदर्शनसाठीही मोठ्या प्रमाणात लेखन केले. त्यांच्या गझलेचा इंग्रजी, पंजाबी, कन्नड आणि मराठीतही अनुवाद झाला.