आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेतील विद्यार्थ्याला हवी जालन्यातून ‘आप’ची लोकसभेची उमेदवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सामाजिक सुधारणा व राजकीय बदल घडवण्यासाठी ‘आप’कडून खासदारकीची उमेदवारी मिळावी यासाठी जालना जिल्ह्यातील भाटेवाडीच्या दिलीप म्हस्के यांनी ऑनलाइन अर्ज सादर केला आहे. ते सध्या अमेरिकेत पीआर एजन्सीमध्ये नोकरी करून उच्च शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यांनी जालना व उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
देशात भ्रष्टाचार, बलात्कार, गुन्हेगारीचे प्रमाण वाढीस लागले आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत सोयी-सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने ते हैराण झाले आहेत. भारत कृषिप्रधान देश आहे; पण देशातील शेतकरी व शेतीची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आत्महत्या सत्र सुरूच आहे. मूल्यशिक्षणाचा अभाव असल्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. यामध्ये बदल करण्यासाठी उक्तीप्रमाणे कृती करणारे शासन लोकांना हवे आहे. त्यासाठी युवा, तरुण, उच्चशिक्षित मोठय़ा पगाराची नोकरी सोडून 2014 लोकसभा रणसंग्राम लढण्यास इच्छुक आहेत. केवळ जालना लोकसभा मतदारसंघातून 28 जणांनी आपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज भरला आहे. त्यापैकी 22 जण उच्चशिक्षित असल्याचे पार्टीचे समन्वयक कैलास फुलारी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. त्यामध्ये दिलीप यांचा समावेश होतो. त्यांनी एम. एस. डब्ल्यू., एलएलबी, मुंबई आयआयटीमधून एम. फिल. आणि यूएसएमध्ये पीएचडी केली असून सध्या गलेगठ्ठ पगारावर नोकरी करत आहेत. आम आदमी पार्टीने स्वच्छ चारित्र्य, सामाजिक, नैतिक, उच्चशिक्षितांना पार्टीत येण्याचे व उमेदवारीसाठी अर्ज भरण्याचे खुले आवाहन केले होते. त्यानुसार दिलीप यांनी अर्ज भरला असून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपकडून उमेदवारी मिळाली नाही तर आपण स्वच्छ प्रतिमा असलेल्या राजकीय उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.जनतेला बदल हवा
जालना लोकसभा मतदारसंघात दळणवळणासाठी सरळ रस्ते नाहीत. शेतकरी, गरीब, कष्टकरी हालअपेष्टा सहन करून जीवन जगत आहेत. तोच तो पक्ष आणि नेत्याला लोक कंटाळले आहेत. आपला चांगला प्रतिसाद मिळत असून 28 जणांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापैकी 22 उच्चशिक्षित उमेदवार आहेत. अमेरिकेत पीआर एजन्सीमध्ये मोठय़ा पगारावर नोकरी करणार्‍या दिलीप म्हस्के यांचा यामध्ये समावेश आहे. ते जालना आणि उत्तर मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहेत. लवकरच उमेदवारी जाहीर होतील. कैलास फुलारी, जिल्हा समन्वयक, जालना लोकसभा.