आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाह उस्ताद'मध्ये औरंगाबादकर चिंब, प्रोझोन मॉलच्या लॉन्सवर रसिकांनी घेतला ताल आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अखंडपणे खिळवून ठेवत अलौकिक रसतृप्ती देणारा अनुपम सोहळा आज औरंगाबादच्या रसिकांनी अनुभवला. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तुफानी तबलावादनाची पर्वणी तर पं. रोणू मुजुमदार यांचे हुकमी वेणुवादन आणि पं. अतुलकुमार उपाध्याय यांच्या मधुरवेल्हाळ व्हायोलिन वादनाच्या जुगलबंदीने उपस्थितांवर गारूड केले. तब्बल तीन तास रंगलेल्या या संगीत सोहळ्यात रसिक चिंब झाले.
आपल्या तबलावादनाने उभ्या जगाला वेड लावणारे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या जादुई बोटांची किमया अनुभवण्याची संधी रविवारी सायंकाळी औरंगाबादवासीयांना प्रोझोन मॉलच्या लॉन्सवर मिळाली. प्रोझोन मॉल, पुण्यातील व्हायोलिन अकादमी आणि इंड्युरन्स प्रस्तुत "वाह उस्ताद’ या संगीत सोहळ्याने कानसेनांना तृप्त केले. प्रारंभी इंड्युरन्स अध्यक्ष अनुराग जैन, वर्षा जैन, प्रोझोनचे अध्यक्ष अनिल इरावणे, व्हायोलिन अकादमीचे पं.अतुलकुमार उपाध्ये, राजस उपाध्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या संगीत सोहळ्याची सुरुवात पं. रोणू मुजुमदार यांचे वेणुवादन आणि पं. अतुलकुमार उपाध्याय यांच्या व्हायोलिन वादनाच्या जुगलबंदीने झाली. बासरीतील विलक्षण ताकदीची फुंक रसिकांच्या मनावर अधिराज्य करू शकते, हे पं. मुजुमदार यांनी आपल्या माधुर्यपूर्ण सादरीकरणाने सिद्ध केले. प्रत्येक स्वर हृदयाच्या ठाव घेणारा आणि तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा, तर आलापी मंत्रमुग्ध करणारी होती. पं. उपाध्ये यांच्या व्हायोलिन वादनातील विलोभनीय रसनिष्पत्ती आणि प्रत्येक जागा वेगवेगळी अनुभूती देणारी ठरली. सुरुवातीला राग यमनला प्राधान्य देत त्यांनी आलाप जोड झाला सादर केला. यानंतर तीन ताल मध्य लयीतील बंदिश मोठ्या ताकदीने फुलवली. दोन्ही कलावंतांनी आपले स्वतंत्र अस्तित्व जोपासत वाद्यसंगीत सादर केले. यानंतर एक तालातील बंदिश रंगली. बासरीची नजाकत आणि व्हायोलिनची मोहकता यामुळे ही बंदिश रसिकांसाठी खास स्मरणीय ठरली. द्रुत लय तीन तालातील बंदिशही दाद घेऊन गेली. बंदिशीचे पारंपरिक सौंदर्य दोन्ही कलावंतांनी आपल्या प्रामाणिक सरावाने सादर केले. या जुगलबंदीला मुकेश जाधव यांनी तबल्यावर साथसंगत करत रंगत आणली.
वेणुवादन आणि व्हायोलिनच्या सुरावटीत रसिक चिंब झाले असतानाच तालाचा बादशहा समजले जाणारे उस्ताद झाकीर हुसेन यांचे आगमन होताच रसिकांमध्ये चैतन्य आले. टाळ्यांच्या कडकडाटात, उभे राहून रसिकांनी आपल्या उत्कंठतेला वाट करून दिली. तब्बल दोन तास रंगलेल्या तबलावादनाने मैफलीचा कळस गाठला. आपल्या वादनाची सुरुवात त्यांनी तीन तालातील एकल सादरीकरणाने केली. सुरुवातीपासूनच ‘वाह उस्ताद वाह!’ ही दाद अलगदच रसिकांच्या तोंडून निघत होती.
पंजाबी घराण्याच्या समृद्ध परंपरेचे पाईक असणारे उस्ताद यांनी अख्खे तालवैभवच रसिकांसमोर उलगडले. पारंपरिक त्रितालातील कायदे, पलटे, रेले विविध अंगांनी साधत जाणारा लयींचा मेळ व लहेऱ्यांच्या सुरावटीने रसिक तालाच्या सागरात अथांग भिजले. भारतीय संस्कृतीतील धार्मिक अधिष्ठातांना आणि त्यांच्या प्रतीकांना स्मरण करत त्यांनी शिवाचे तांडव मोठ्या खुबीने तबल्यावर सादर केले. पृथ्वीचा नाश होत असताना गौरीने शिवाला केलेली विनवणी आणि त्यातून निर्माण झालेला लास्य भाव, या सगळ्यांचे मिळून तयार झालेला ताल, याला डमरू या वाद्याची मिळालेली साथ त्यांनी तबल्याच्या माध्यमातून सादर करत उपस्थितांना अचंबित केले.
दिवाळीमध्ये उडणाऱ्या फटाक्यांचे आवाज ऐकताना रसिकांचे भान हरपले. रॉकेटचा सुसाट आवाज, सुरसुऱ्यांचा काहीसा मंद स्वर तर बॉम्बचा धमाल आवाज सुखावणारे ठरले. लाल किल्ल्यावर वाजवण्यात येणारा नगारा मोठ्या सहजतेने त्यांनी सादर केला. रेला सादर करताना रेल्वेगाडीचा स्वर त्यांनी उभा केला. सुरुवातीला मंद, नंतर काहीसा आक्रमक आवाजात वाजणारा भोंगा दाद घेऊन गेला. यानंतर त्यांनी ‘नटवरलाल नार नाचत चपल’ ही बंदिश सादर केली. ती बंदिशही रसिकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या या वादनाला उस्ताद दिलशाद खान यांच्या
सारंगीवादनाने समर्थ साथसंगत केली. लय आणि तालाची ही आनंदयात्रा शेवटपर्यंत रसिकांना सुखदायी ठरली.

धन्यवाद औरंगाबाद !
शहरात अभिजात शास्त्रीय संगीताची परंपरा जोपासण्यासाठी प्रोझोन सातत्याने प्रयत्न करत आला आहे. गेली चार वर्षे सुरू असणारा स्वरझंकार संगीत महोत्सव त्याचाच एक भाग आहे. हीच परंपरा कायम ठेवत गेली दोन महिने वाह उस्तादची तयारी सुरू होती. यास रसिकांचा मिळालेला प्रतिसाद अविस्मरणीय होता. यासाठी औरंगाबादवासीयांचे मनापासून धन्यवाद. भविष्यातही असेच दर्जेदार कार्यक्रम सादर करण्यास प्रोझोन कटिबद्ध आहे. अनिल इरावणे, अध्यक्ष, प्रोझोन