आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्रुपद गायकीतील तेजस्वी तारा निखळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ध्रुपद गायकीतील दीपस्तंभ झिया फरिदुद्दीन डागर यांच्या निधनाने ध्रुपदचा तारा निखळला असल्याची प्रतिक्रिया संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील सर्वात जुना प्रकार असलेल्या ध्रुपद गायकीची जोपासना आणि संवर्धन करण्याचे काम फरिदुद्दीन डागर यांनी केले. ध्रुपद गायकीसाठी आयुष्य वेचणार्‍या डागर यांना संगीत नाटक अकादमी, पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच औरंगाबादेतील संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. औरंगाबाद शहरातील संगीतविश्वाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.

पारंपरिकता जपत प्रयोगशीलता जोपासली
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा धृपद गायन हा पाया आहे. ही कला मृतवत होत असताना त्यांनी तिची जोपासना करताना पारंपरिकपणा जपून धृपद गायकी लोकप्रिय व्हावी यासाठी नवनवे प्रयोग केले. यातून नव्या पिढीला या गायनाकडे आकर्षित करून अनेक शिष्य तयार केले. धृपद गायन जिवंत आहे त्याचे श्रेय त्यांनाच आहे. 1998 मध्ये महागामीत तर 2000 ला पुण्यामध्ये त्यांचा स्वर्गीय सूर ऐकण्याची संधी मला लाभली.
-सचिन नेवपूरकर, शास्त्रीय गायक

‘नाद’ची स्थापना त्यांचीच
नाद फाउंडेशनची स्थापना त्यांनीच केली. ध्रुपद गायनाची परंपरा जोपासणे, तिचा प्रचार-प्रसार करण्याचे श्रेय त्यांनाच आहे. यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. नव्या पिढीने दर्जेदार संगीत ऐकावे यासाठी ते आग्रही राहायचे. 2003 मध्ये संस्था त्यांच्याच मार्गदश्रनाने स्थापन झाली. 2005 मध्ये ‘श्रद्धा’ हा त्यांना अर्पण असलेला कार्यक्रम आम्ही केला. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आमच्या मनात सदैव जिवंत राहतील.
-आरती पाटणकर, शास्त्रीय गायिका

कला जिवंत ठेवण्याचे श्रे
प्राचीन ध्रुपद गायन कला जिवंत ठेवण्याचे श्रेय डागर यांना आहे. ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर असताना त्यांनी या कलेचे अनेक शिष्य निर्माण केले, कलेचा वारसा संपन्न करण्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन बहाल केले. भोपाळ येथील ध्रुपद केंद्रातून त्यांनी महान कार्य करून ठेवले आहे. महागामीच्या स्थापनेपासून प्रत्येक वेळी त्यांची उपस्थिती आणि मार्गदश्रन मिळत होते. शारंगदेव महोत्सवाच्या पहिला शारंगदेव पुरस्काराचे ते मानकरी आहेत. त्यांच्या निधनाने ध्रुपद गायनात महत्त्वाचे योगदान दिलेले नेतृत्व हरवले आहे.
-पार्वती दत्ता, संचालिका (महागामी)

सुरांची साधना आणि तालांचा अप्रतिम खेळ
डागर यांची सूरसाधना अप्रतिम होती. ताल खेळवण्याचा त्यांचा बाज उल्लेखनीय होता. ख्याल गायकीची सर्वत्र लोकप्रियता असताना ध्रुपद गायनाला लोकप्रिय करणे हे मोठे आव्हान त्यांनी सहज सुसह्य केले. त्यांनी नवगायकांना ध्रुपदाकडे आकर्षित केले.
-आशालता करलगीकर, गायिका

ध्रुपद गायकी जनमानसात रुजवली
डागर बंधू यांचे घराणे ध्रुपद गायकीचे आणि या गायकीसाठी झिया फरिदुद्दीन डागर साहेबांनी स्वत:चे जीवन वाहून घेतले. ध्रुपद ही प्राचीन परंपरेतील गायकी. ख्याल गायकीपेक्षा यात भारदस्तपणा जास्त आहे. ही गायकी सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य डागर साहेबांनी केले. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी अनेक शिष्य घडवले आणि ध्रुपद गायकी जनमानसात रुजवण्यासाठी अव्याहत प्रयत्न केले.
- पं. विश्वनाथ ओक, ज्येष्ठ संगीतकार

ध्रुपद गायकीचे मोठे नुकसान
ध्रुपद गायकीसाठी ख्यातनाम असलेल्या डागर घराण्यातील झिया फरिदुद्दीन डागर म्हणजे ध्रुपदचा तेजस्वी तारा. मात्र आज हा तारा निखळला. त्यांनी अनेक शिष्य घडवले. त्यांच्या निधनाने ध्रुपद गायकीचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद शहरातही त्यांचे असंख्य चाहते होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
- पं. नाथ नेरळकर, ज्येष्ठ गायक