औरंगाबाद - उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या वतीने २० व २१ जानेवारीदरम्यान "उत्कर्ष' या सातव्या राजस्तरीय सामाजिक सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील २५ विद्यापीठांतील ४५० कलावंत सहभागी होणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. बी. ए.चोपडे यांनी दिली.
२० जानेवारी रोजी स्पर्धेचे उद््घाटन सकाळी १०:३० वाजता कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते होईल. वृक्ष लागवड करून स्पर्धेचे उद््घाटन होईल. समारोप २२ जानेवारीला सकाळी १०:३० वाजता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धांत नाटक, संकल्पना नृत्य, नाट्य -पथनाट्य,संगीत- समूहगीत,भारतीय लोकवाद्य,भारतीय लोककला- पोवाडा,भारूड,भजन, ललितकला - भित्तिचित्र, साहित्य, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, कविता,छायाचित्रण आदी कलाप्रकार सादर होणार आहेत.
पत्रकार परिषदेस विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ. राजेश करपे, डॉ. महेंद्र शिरसाट, संजय शिंदे उपस्थित होते.