आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttamsingh Pawar News In Marathi, Aurangabad Lok Sabha Constituncy

उत्तमसिंह पवारांचा बंडाचा झेंडा,अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी गेल्या पाच वर्षांपासून सुरू केली असतानाही श्रेष्ठींनी माजी आमदार नितीन पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने नाराज झालेले माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. स्वबळावर मैदानात उतरण्यासाठी त्यांनी मंगळवारी (25 मार्च) सकाळी 11 वाजता सिडकोतील गणेश मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. कार्यकर्ते आदेश देतील ते होईल, लोकभावनेबद्दल मी काहीही ठरवू शकत नाही, असे पवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.


मतदारसंघातील 25 हजार तरुण आणि 10 हजार महिलांनी उत्तमसिंह यांना पाठिंबा दर्शवला असून पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा, अशी या 35 हजार कार्यकर्त्यांची मागणी आहे. ते म्हणतील त्यानुसार पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार, हेही स्पष्ट झाले आहे.


शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि फुलंब्रीचे आमदार डॉ. कल्याण काळे यांनी खैरेंविरुद्ध मैदानात उतरावे, अशी र्शेष्ठींची इच्छा होती; परंतु या दोघांनी नकार दिल्याने दुसरा तगडा उमेदवार मीच, असा पवार यांचा दावा होता. गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीच्या कामाला लागलेले पवार निश्चिंत होते. कोणी काहीही म्हणो, मीच उमेदवार, असा दावा ते खासगीत करत होते. परंतु सोमवारी सायंकाळी पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आणि सर्मथकांबरोबरच पवारही अस्वस्थ झाले. पुढे काय, अशी विचारणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीतच काय तो निर्णय होईल, असे पवारांनी स्पष्ट केले.


सायकलवर की हत्तीवर?
मंगळवारी सकाळी 11 वाजता होणारी कार्यकर्त्यांची बैठक म्हणजे औपचारिकता असून पवार एक तर अपक्ष म्हणून रिंगणात येतील किंवा समाजवादी पक्षाच्या सायकलीवर अथवा बहुजन समाज पक्षाच्या हत्तीवर विराजमान होतील, अशी चिन्हे आहेत. अर्थात याचा निर्णय मंगळवारी होणार असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाहीच, असे पवार यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या लढतीत रंग भरण्याची चिन्हे आहेत.


पवार यांचा राजकीय प्रवास
पवार हे मूळ काँग्रेसचे. 1990 च्या दशकात त्यांनी जनता दलाचे चक्र हाती घेतले. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून ते लढले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 1997 ला ते जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून खासदार झाले. 1999 मध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले. 2009 मध्ये त्यांना खैरेंविरुद्ध औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा होती. र्शीमती पाटील सत्तेबाहेर गेल्यामुळे या वेळी पवार यांची डाळ शिजणार नाही, अशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात होती.

खैरेंकडून दोघांचेही स्वागत
युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी पाटील यांची उमेदवारी अन् पवार यांची नाराजी या दोन्हीही गोष्टींचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने स्पर्धेत कोण हे समोर आले अन् पवार नाराज झाल्याने स्पर्धकासोबत काय होणार हेही समजले. त्यामुळे मी दोघांचेही स्वागत करतो.