आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतण्याची अशा: आई, आजी-आजोबा केव्हा येतील गं..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चारधाम यात्रा करण्यासाठी घराबाहेर पडणार्‍या आजी आजोबांना लवकर परत या, मला खेळणी, प्रसाद आणा असे सांगणार्‍या चार वर्षांच्या कौशलला केवळ आजोबाने घेतलेली खेळणी, प्रसाद, शेवटी काढलेले फोटो मिळाले. मात्र आजी आजोबा दिसले नाही. त्यांच्या फोटोकडे पाहून त्याने आजी आजोबा केव्हा येतील गं? असा प्रश्न आईला केला. हे ऐकून उपस्थितांचे डोळे अलगदच पाणावले.

उत्तराखंडला गेलेल्या शहरातील 22 जणांचा अद्याप पत्ता लागला नाही. त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने शनिवारी (6 जुलै) प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेतली. तेव्हा प्रत्येक घरात चिर शांतता आणि बेपत्ता सदस्यांची परत येण्याची आशा होती. गजानननगरातील अनंत कुलकर्णी (60) त्यांची पत्नी श्यामल कुलकर्णी (55) मेहुणा रमेश जोशी, स्मिता जोशी आणि मेहुणी भारती पाठक, भानुदास पाठक यांच्यासह उत्तराखंडला गेले होते. मात्र गौरी कुंडाजवळ आलेल्या प्रलयात ते बेपत्ता झाले. दोन दिवस वाट पाहून मुलगा नीलेश व सचिन यांनी तत्काळ ऋषीकेश गाठून दहा दिवस शोध घेतला. मात्र कोणीही न सापडल्याने ते घरी परतले. मात्र परत येताना अंबिका एजन्सीने अनंत कुलकर्णी व त्यांच्या सदस्यांची रेल्वे बोगीत सांभाळून ठेवलेल्या बॅग परत दिल्या. त्यावेळीही कौशलने पप्पा तुम्हीच आलात, आजी-आजोबा कुठे आहे, असा प्रश्न केला होता.

शेवटच्या आठवणीच मिळाल्या
पाठक आणि कुलकर्णी यांच्या बॅगा मिळाल्या तेव्हा त्यात त्यांनी हरिद्वार, सोमनाथ, आग्रा येथे काढलेले सपत्नीक शेवटचे फोटो मिळाले. तसेच चिमुरड्यांना खेळण्यासाठी घेतलेली खेळणी, प्रत्येक ठिकाणचा प्रसाद त्यांच्या बॅगेत होता.

दाभाडकरही बेपत्ता :
शहरातील आविष्कार कॉलनीतील जयकुमार दाभाडकर, सुरेश दाभाडकर, विजयकुमार दाभाडकर, विद्या दाभाडकर, श्याम सुंदर दाभाडकर हेसुद्धा उत्तराखंडात गेले होते. तेही परतले नाही, त्यांच्या शोधासाठी जावई मनोज कुलकर्णी गेले होते. मात्र त्यांचीही निराशा झाली.

अफवा पसरवून लूट
बेपत्ता कुटुबीयांच्या सदस्यांनी त्यांचे फोटो उत्तराखंडातील देवस्थान, कॅम्पमध्ये लावून संपर्क नंबर चिकटवले आहे. मात्र या संपर्क नंबरवर संपर्क साधून त्यांना तेथे बोलावून लूट करण्यात येत आहे.

आई-वडिलांशीवाय काहीच नाही
आम्हाला आई-वडिलांचा आधार होता. घरातील मोठी व्यक्ती गेली आहे. मुलंही त्यांची आठवण काढतात. झोपही येत नाही.
-नीलेश कुलकर्णी

चमत्कार व्हावा, ते परतावे
काही चमत्कार होऊ दे, आणि ते मृत्यूच्या दाढेतून परतावेत, हीच ईश्वराकडे शेवटची इच्छा आहे.
-जयश्री दाभाडकर

मोठा आघात झाला
उत्तराखंडात आलेल्या प्रलयानंतर आई वडील मिळाले नसल्याने, मोठा आघात झाला. आम्ही सर्व प्रयत्न केले. ते येण्याची अजूनही आशा आहे. चातकाप्रमाणे त्यांची वाट पाहत आहोत.
-सचिन पाठक