आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: उत्तर प्रदेशमधून येऊन लुटणाऱ्या टोळीचा म्हाेरक्या गजाआड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : कारखाली ऑइल टाकून चालकाची दिशाभूल करत किंवा एकट्या व्यक्तीला गाठून त्याच्या अंगावर शरीराला खाज आणणारा स्प्रे मारून लुटणाऱ्या टोळीच्या वीस वर्षीय म्होरक्याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. क्रांती चौकात एका कारचालकाला लुटल्यानंतर पळून जात असताना गस्तीवर असणाऱ्या मोबाइल टू व्हॅनच्या कर्मचाऱ्यांनी पकडून क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. अविनाश मुत्तू नायडू (२०, रा. लखनऊ उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. 
 
१४ जून रोजी सकाळी १०.२० वाजता बाबासाहेब शेंडगे (५०, रा. समर्थनगर) हे कामानिमित्त कारने क्रांती चौकात आले होते. मोबाइलवर बोलत असताना अविनाशने त्यांच्या कारखाली आधीच ऑइल टाकून तुमच्या कारचे ऑइल गळत असल्याचे सांगितले. त्यांनी खाली उतरून पाहिले असता त्यांना कारखाली ऑइल दिसले. त्यामुळे त्यांनी कारचे बोनेट उघडले तेव्हा कारमध्ये ठेवलेली बॅग घेऊन अविनाश पळून जाताना दिसताच शेंडगे यांनी आरडाओरड करून त्याचा पाठलाग सुरू केला. तेव्हा गस्तीवर असलेल्या मोबाइल टू व्हॅनच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले. पुढील चौकशीसाठी क्रांती चाैक पोलिसाच्या ताब्यात दिले. दरम्यान, आरोपीला पकडल्यानंतर दुभाजकावर डोके आपटले. यात तो जखमी झाला. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने १४ जून रोजी एकाला लुटल्याची कबुली दिली. त्यांची चार ते पाच जणांची टोळी असून त्याला अटक होताच लांब उभे असलेल्या त्याच्या महिला साथीदार पळून गेल्या. 
 
अंगाला खाज आणणारा स्प्रे मारून लुटले 
१३जून रोजी व्यापारी सुरेश जेठानी (४०, रा. ज्योतीनगर) हे सायंकाळी ६.३० वाजता गोमटेश मार्केटजवळ गाडी उभी करून कामासाठी थोड्या अंतरावर गेले. यादरम्यान अविनाश त्याच्या टोळीने जेठानी यांच्या गाडीचे चाक पंक्चर केले. जेठानी आल्यावर हा प्रकार पाहून त्यांनी जवळच असलेल्या पंक्चरच्या दुकानात गाडी नेली. परंतु गाडीखाली उतरताच त्यांच्या अंगाला अचानक खाज सुटली. काहीच सुचत नसल्याचे लक्षात येताच अविनाशने त्यांच्या गाडीतील हजार २१० रुपये महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. चौकशीत अविनाशनेच हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले. 
 
आधी नाशिक, आता औरंगाबाद 
या टोळीने नाशिक येथे महिनाभर मुक्काम ठोकला. यात दोन ते तीन महिला आहेत. चार ते पाच दिवसांपूर्वीच ते शहरात येऊन लुटत होते. त्याच्या मुसक्या आवळल्याने टोळी पळून गेली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याकडून ऑइल, खाजेचा स्प्रे, गुलेरचे छर्रे, पैसे जप्त करण्यात आले. ही कारवाई निरीक्षक अनिल आडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय सूर्यवंशी, गोपाल सोनवणे, डी. एम. कुऱ्हाडे, आर. एन. फिरंगे, अनिल इंगोले यांनी केली. 
 
बातम्या आणखी आहेत...