आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"पिंजरा' ने मिळवून दिला अस्सल लावण्यांचा आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘तुम्हावरकेली मी मर्जी बहाल’....‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी.’... ‘आली ठुमकत नार लचकत’ यांसारख्या ठसकेबाज लावण्यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटाने व्ही. शांताराम महोत्सवाची देखणी सांगता झाली. १९७२ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील लावण्यांची भुरळ आजही कायम आहे, हे सभागृहात लावण्यांवर डोलणाऱ्या माना पाहून जाणवत होते. गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीचा परिसर प्रेक्षकांनी गच्च भरला होता. खुर्च्यांखेरीज पायऱ्यांवरही तरुणाईने गर्दी केली होती.
गावचे गुरुजी ते तमाशाच्या फडावरचा मास्तर असा एका शिक्षकाचा प्रवास यामध्ये दाखवण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम लागू, संध्या शांताराम, निळू फुले यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. आदर्श, चरित्र आणि मानवी भावनांचे अनेक चढउतार असलेला हा चित्रपट एकदा पाहिला तरी कायम स्मरणात राहतो. नृत्यात पारंगत असलेल्या संध्या यांची प्रत्येक लावणी ठसठशीत होती. त्यातील अदाकारी मनात घर करते. तर चित्रपटातील इतर सहायक भूमिकांमध्ये असलेल्या प्रत्येक पात्राचा अभिनय लक्षात राहण्याजोगा आहे. शंकर बाबाजी पाटील यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना शांताराम बापूंनी प्रत्येक धागा अतिशय तरलतेने विणला आहे. दिग्दर्शन कौशल्य आणि त्यांचा तगडा अनुभव हा चित्रपट पाहताना प्रत्ययाला येतो. गेल्या सहा दिवसांपासून अतिशय भक्तीपूर्ण उत्साहाने व्ही. शांताराम चित्रपट महोत्सवाला हजेरी लावणाऱ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. थंडीचा कडाका वाढला असला तरीही रसिकांची पावले महोत्सवाकडे वळल्यावाचून राहिली नाहीत. सभागृहाबाहेर लावलेल्या स्क्रीनसमोरही खच्चून गर्दी होती. ती चित्रपटांची ताकद दाखवून गेली.

चित्रपटांवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना : शांताराम म्हणाले की, व्ही. शांताराम यांच्यावर किंवा त्यांच्या चित्रपटांवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाखाची शिष्यवृत्ती या वर्षीपासून सुरू केली आहे, औरंगाबादेतील विद्यार्थ्यांनीही त्यात भाग घ्यावा. चित्रपट हे एक सशक्त माध्यम आहे, त्यात मराठी तरुणांनी आपल्या कल्पकतेचे रंग भरावेत. माझ्या वडिलांनी चित्रपटांच्या माध्यमातून समाजसेवा केली. त्यासाठी शेवटपर्यंत ते बांधील राहिले. त्यांची प्रेरणा घेऊन काम करता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शांताराम बापूंनी चित्रपट क्षेत्रात हिमालयाएवढे काम करून ठेवले आहे. त्यांचा नुसता वारसा जतन केला तरीही भरपूर आहे. त्यामुळे चित्रपट बनवणे यापेक्षाही चित्रपट पाहण्याचे कौशल्य शिकवणे, त्यासाठी चिंतन करणारा वर्ग निर्माण करणे महत्त्वाचे वाटते. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेला चित्रपटविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लागेल ती मदत व्ही. शांताराम फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाईल, असे आश्वासन किरण शांताराम यांनी चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारोहात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना दिले. त्यांंच्या पत्नी ज्योती शांताराम, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, अॅड. दिनेश वकील, डॉ. श्रीरंग देशपांडे, ज्येष्ठ सिनेपत्रकार अशोक उजळंबकर, प्राचार्य जे. एस. खैरनार यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...