अजिंठा- औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील वाघूर नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून संरक्षक कठडे नसल्याने येथे मोठ्या अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच पुलावरील सपोर्ट कॉलमचे लोखंडी गजदेखील खड्ड्यांमुळे उघडे पडले असून या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
औरंगाबाद येथील एका ठेकेदाराने हे काम दोन वर्षांपूर्वी हाती घेतले होते. सहा महिन्यांत काम वेगात सुरू होते. मात्र, नंतर काही कारणांमुळे हे काम बंद केले होते. याबाबतही "दिव्य मराठी'ने सचित्र वृत्त प्रकाशित झाले केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी या मुद्द्यावरून बैठकीत ठेकेदाराला झापले होते. तेव्हा कामाला सुरुवात झाली होती. परत हे काम सहा महिन्यांपासून बंद झाल्याने खड्डे पडले असून त्यात संरक्षक कठडे नसल्याने पूल धोकादायक बनला आहे. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी असल्यामुळे देश-विदेशातील अनेक पर्यटकांच्या वाहनांची नेहमी या पुलावरून वर्दळ असते. हा पूल लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी पर्यटक करत आहेत.
पुलावरील लोखंडी रॉड उघडे पडले
वाघूर नदी पुलाचे काम औरंगाबाद येथील वंडर कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे. मी आताच येथे रुजू झालो, त्यामुळे वाघूर नदी पुलाचे काम का बंद आहे याची माहिती नाही, तरी माहिती घेऊन सांगतो.
-सुधीर चव्हाण, बांधकाम विभाग, फर्दापूर.
पुलावरून डांबरी रस्त्यावर दोन ते तीन फुटांचे खड्डे पडले आहेत. यात जुन्या पुलाच्या सपोर्टसाठी लावलेला लोखंडी ढाचाही स्पष्ट दिसू लागला आहे, तरी संबंधितांचे दुर्लक्ष होत आहेत.
या पुलावरून आयशरखाली पडून दोन ठार झाले होते. शिवाय ट्रक नदीत कोसळता- कोसळता वाचला होता. त्या वेळी रात्रभर वाहतूक ठप्प होती,
-समी चाऊस, ग्रामस्थ
संरक्षक कठडे नसल्यामुळे पूल धोकादायक बनला असून पुलावरच खड्डा पडल्यामुळे जुने लोखंडी राॅड दिसत आहेत, तर नवीन पुलाचे अर्धवट झालेले काम. छायाचित्र : दिलीप गुप्ता, अजिंठा.