आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरात ८७ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील ८७ हजार हेक्टर क्षेत्रावरील लागवड केलेल्या खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे.
पावसाअभावी उगवण झालेल्या पिकांनी माना टाकल्या आहेत. आणखी चार दिवस पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. महसूल विभागाने पिकांची पाहणी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

वैजापूर तालुक्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा (९४ मिमी) जास्त पाऊस पडला. त्यामुळे मृगाच्या पावसावर शेतकऱ्यांनी वेगाने खरिपाच्या पेरण्या केल्या. तालुक्यातील १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत ८७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, मका या नगदी पिकांसह इतर पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. कपाशीची पेरणी ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे, तर २२ हजार हेक्टरवर मका पिकाची पेरणी झाली आहे. या वर्षी मृगाचा पाऊस चांगला झाल्याने शेते पिकांनी बहरली आहेत. परंतु या पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पावसाने ताण दिल्याने उगवण झालेली पिके माना टाकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ही पिके कशी जगवायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आणखी चार ते पाच दिवस पाऊस न झाल्यास पिकांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या तीन वर्षांपासून मेटाकुटीस आलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.
दमट वातावरण व वाऱ्यामुळे पाऊस दररोज हुलकावणी देत आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी, उताराला आडवी पेरणी करणे, पेरणी यंत्राचा वापर करावा यासारख्या उपाययोजना कृषी विभागाने सुचवल्या आहेत.

पिकांचा पंचनामा करावा
पाऊस गायब झाल्यामुळे शेतातील पिकांनी माना टाकल्या आहेत. या पिकांच्या पेरणीसाठी मी चाळीस हजार रुपये खर्च केले आहेत. पीक वाया गेल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने पाहणी करून पंचनामा करावा.
काळू वैद्य, शेतकरी, पानवी खंडाळा
बातम्या आणखी आहेत...