आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैजापुरातही लाखाचा मूक हुंकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - वैजापूर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच सकल मराठा समाजबांधवांनी गुरुवारी विविध न्याय्य हक्काच्या प्रमुख मागण्यांसाठी सव्वा लाख जनसमुदायाच्या एकजुटीतून काढलेल्या विराट मराठा मूक क्रांती मोर्चाने नवा विक्रम प्रस्थापित केला. संभाजी महाराज चौकातून सकाळी ११.३० वाजता प्रारंभ झालेल्या मोर्चाचा समारोप शिवराई रोड येथे जाहीर सभेने झाला.या सभेत सात विद्यार्थिनींनी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर जाहीर सभेत विविध मागण्या करण्यात आल्या.
राज्यात जिल्हास्तरावर मराठा मूक क्रांती मोर्चाचे लाखोचे मोर्चे पार पडल्यानंतर तालुकास्तरावर या मागणीची जनमानसात निर्माण झालेली तीव्रता सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी आयोजन करण्यात आलेल्या पहिल्या मराठा क्रांती मूकमोर्चाने सव्वा लाख जनसमुदायाच्या सहभागाचा यशस्वी टप्पा गाठला.
संयोजकानी आखलेले नियोजनव शिस्तबद्ध मार्गाने शहरातील संभाजी महाराज चौकात शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळयास मुलीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन ११.३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला, विद्यार्थी, वकील, डॉक्टर, शिक्षक, नागरिक आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते व शेवटी संयोजक अशा प्राधान्यक्रमाने मोर्चात सहभागी झालेल्या सव्वा लाख महिला, नागरिकांनी दीड किलोमीटर अंतर पायपीट करून न्याय्य हक्काच्या मागणीसाठी नि:शब्द एल्गार पुकारला. संयोजकांच्या पंधरा दिवसांच्या आवाहनाला शहर व ग्रामीण तसेच शेजारच्या तालुक्यातील महिला, नागरिक, तरुण, विद्यार्थी, सरकारी कर्मचारी सकाळपासून तहानभूक विसरून मिळेल त्या वाहनाने मोर्चासाठी शहरात दाखल झाले होते. हातात भगवा ध्वज घेऊन मोर्चात सहभागी झालेल्या मंडळींनी नि:शब्द वातावरणात प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले.
तालुका पातळीवरील पहिलाच विक्रमी मोर्चा : आतापर्यंत जिल्हास्तरावर पार पडलेल्या अलोट विशाल गर्दीच्या मराठा क्रांती मूकमोर्चांनंतर तालुका पातळीवर गुरुवारी न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी येथील सकल मराठा समाजबांधवांनी काढलेल्या सव्वा लाख जनसमुदायाच्या लक्षणीय उपस्थितीमुळे हा तालुका पातळीवरील पहिला विक्रमी मोर्चा ठरला आहे. पोलिस दलाच्या गुप्तवार्ता विभागाने एक लाख संख्येच्या पुढे उपस्थिताची संख्या असल्याचे स्पष्ट केले.

विविध संघटनांचा हातभार
सकल जैन, मुस्लिम, डॉक्टर असोसिएशन आदी सामाजिक व सेवाभावी संस्थांकडून मोर्चातील नागरिकांना जागोजागी पिण्यासाठी पाणी पुरवठा केला.
प्रशासनाची तयारी कागदावरच राहिली
तालुकास्तरीय मराठा क्रांती मूकमोर्चा कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोर्चाच्या दीड कि.मी लांबीच्या विविध मार्गांवर व्यापक पोलिस बंदोबस्त लावला होता. मात्र संयोजकांनी प्रशासनाच्या तोडीस तोड येथे आपली समांतर यंत्रणा तरुण संयोजकाच्या माध्यमातून उभी केली होती. सुरक्षा, स्वच्छता, वाहन कोंडीची गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी संयोजकांनी सक्रिय भूमिका पार पडल्याने प्रशासनाची तयारी कागदावरच राहिली.
शिस्तबद्ध नियोजनात मोर्चा शांततेत
तालुका पातळीवर मराठा क्रांती मूकमोर्चा पाच हजार तरुण,तरुणी संयोजकाच्या सक्रिय पुढाकार व परिश्रमाच्या बळावर मूकमोर्चा शिस्तबध्द वातावरणात शांततेत संपन्न झाला.मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांना दुरवस्था झालेल्या रस्त्यांची डागडुजी, जागोजागी गर्दी टाळण्यासाठी वाहनतळ,विविध मार्गावरून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना पोहोचविण्यासाठी तरुण संयोजक कार्यरत होते.
बातम्या आणखी आहेत...