आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूचे पाच वाहने पकडले, वैजापूरजवळील वांजरगाव शिवारात गुन्हे शाखेची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुक्यातील गोदापात्रातून खुलेआम अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मंगळवारी पहाटे वांजरगाव शिवारात पकडले. या पथकाने ट्रॅक्टरसह १५ लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलिस पथक नदीपात्रात बेकायदा वाळूचा उपसा वाहतूक करणाऱ्या तस्करांवर कारवाई करीत असल्याने स्थानिक पोलिस या प्रश्नी कर्तव्यशून्य असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार हवालदार अशोक बरडे, आशिष जमधडे, विनोद तांगडे, सागर पाटील यांच्या पथकाने बुधवारी पहाटे वांजरगाव शिवारात अचानक छापा टाकला असता त्या ठिकाणी विनाक्रमांकाच्या तीन ट्रॅक्टरचे चालक मालक हे विनापरवाना वाळूची वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी हे तिन्ही ट्रॅक्टर वीरगाव पोलिस ठाण्यात आणून उभे केले आहेत. या प्रकरणी अशोक बरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जाकीर सय्यद, अशोक त्रिभुवन, हाजी उस्मान शेख, रियाज सय्यद, हसन अली सय्यद, अन्सार आली सय्यद (सर्व रा. वांजरगाव) या सहा जणांविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील महिन्यात पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना खास कारवाईसाठी पाठवले होते. जाधव यांनी दोन वाहनेही पकडली होती. त्यानंतर आता गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे पकडल्याने वीरगाव पोलिसांच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे.

पाचोडलाही पोलिसांची कारवाई
आेव्हरलोडवाळूची वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक पाचोड पोलिसांनी बुधवारी कारवाई करून जप्त केले. त्यांच्याकडून वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आैरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून टाकळी अंबड येथून आेव्हरलोड वाहतूक करणारे हायवा ट्रक (एमएच २० डीई १७३६, एमएच २० सीटी ५३७१) वर जप्तीची कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकाराकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र अंधारे, कुलदीप बिऱ्हाडे यांनी केली.


नदीपात्रातून वाळू माफिया टोळीकडून वाळूचा बेकायदा उपसा वाहतूक येथे खुलेआम सुरू आहे. नागरिकांनी वेळोवेळी रात्री बेकायदा वाळूची वाहतूक करणारी वाहने आपला जीव धोक्यात घालून अडवल्यास स्थानिक महसूल पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. अनेकदा नागरिकांनी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांना कळवल्यानंतर स्थानिक प्रशासन कारवाईला धजावते. नदीपात्रातील वाळू तस्करी कायमस्वरूपी मोडीत काढण्यासाठी स्थानिक महसूल पोलिस प्रशासन कठोर कारवाई करण्यास नेहमी चालढकल करीत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
फोटो - दोन ट्रकवर कारवाई करून पाचोड पोलिस ठाण्यात ते जमा करण्यात आले. छाया: सिद्धार्थ वाहुळे
बातम्या आणखी आहेत...