आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याकूळ पाचशे शेतकरी धडकले; पाणी न सोडल्यास वैजापूर तालुका बंदचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- ठरलेल्या वेळापत्रकानुसार पाण्याचे आवर्तन देण्यास नाशिक पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ 500 शेतक-यांनी वैजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या गंगापूर, वैजापूर तालुक्यांतील शेतक-यांनी संपात व्यक्त केला. पाटपाणी संघर्ष समितीच्या झेंड्याखाली हा मोर्चा काढण्यात आला. भाजपनेही तहसीलसमोर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, मंगळवारी मुंबईत जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

वैजापूर-गंगापूर या दुष्काळग्रस्त तालुक्यांना नांदूर-मधमेश्वर धरणातून जलद कालव्यात पिण्यासाठी पाणी सोडण्याची अनेक दिवसांपासून येथील नागरिकांची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाने नाशिक पाटबंधारे विभागाला यासंदर्भात कळवले आहे, परंतु कार्यकारी अभियंता ए. एन. म्हस्के यांनी पाणी सोडण्यास नकार दर्शवला आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील व्याकूळ झालेल्या शेतक-यांनी धरणाचे दरवाजे उघडून जलद कालव्यात पाणी सोडले होते. पोलिस बळाचा वापर करून ते पाणी बंद करण्यात आले.

सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून पाटपाणी संघर्ष समितीचे अ‍ॅड. प्रतापराव सोमवंशी, अ‍ॅड. जे. के. भालेराव, ज्ञानेश्वर जगताप, अ‍ॅड प्रमोद राठोड, अ‍ॅड. प्रकाश निंबाळकर, अहिलाजी डमाळे आदींच्या नेतृत्वाखाली पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. 20 मार्चपर्यंत पाणी न सोडल्यास वैजापूर बंद ठेवण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

नाशिककडून केराची टोपली- गोदावरी पाटबंधारेचे उपअधीक्षक अभियंता प्र. व. वझे यांनी वैजापूर-गंगापूर तालुक्यांतील 69 गावांना पिण्यासाठी दारणा समूहातून प्रत्येकी 1 टीएमसी या प्रमाणे दोन आवर्तने नांदूर-मधमेश्वर कालव्यात सोडण्याचे पत्र नाशिक पाटबंधारे विभागाला दिले होते. पहिल्या आवर्तनात 9 दिवसांत 750 क्युसेक्स वेगाने 1380 दशलक्ष घनफूट पाणी 10 मार्च रोजी सोडावे व त्यानंतरचे दुसरे आवर्तन 10 मे रोजी 90 दिवसांत 1580 दशलक्ष घनफूट पाणी सोडावे, असे वेळापत्रक होते. मात्र, ते पाळण्यात आले नाही.

भाजपचे उपोषण - कालव्यात पाणी सोडावे व शेतक-यांवर निफाड पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, या मागणीसाठी भाजपचे नेते एकनाथ जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी तहसीलसमोर उपोषण केले.
नांदूर-मधमेश्वर कालव्यात पाणी सोडावे, या मागणीसाठी सोमवारी भाजप आणि पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा आणि उपोषणाचे हत्यार उपसले होते.

बंदोबस्त भेदून मनसेकडून ऑफिसची तोडफोड- आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. विशेष म्हणजे प्रकल्प कार्यालयाबाहेर दोन दिवसांपासून कडक बंदोबस्त असताना मनसेच्या पदाधिका-यांनी सुरक्षेचे चक्रव्यूह तोडले. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकारी अभियंता आर. एम. वाघमारे यांच्या दालनातील खुर्च्या व काचांची तोडफोड केली. तालुकाध्यक्ष बाळासाहेब धंगाळे, बाळा सुतवणे, अनिल वाळुंज, अनिल गायकवाड, नामदेव ठेंग, संतोष मिसाळ या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली.