आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तू अभी तक है हसीं और मैं जवां..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"प्रेम कालही होते आणि आजही. ‘कसमें, वादे, इजहार’ कालही होते आणि आजही.. व्हॅलेंटाइन डे कालही होता आणि आजही..कुणी म्हणेल हा दिवस कालही होता का ? तर उत्तर आहे, ‘होय, होता.’ तब्बल 50 वर्षांपूर्वी औरंगाबादचे सय्यद मुश्ताक कादरी आणि अनिसा यांनी व्हॅलेंटाइन डे साजरा केला आणि आजही करत आहेत. व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधून या दांपत्याने 14 फेब्रुवारी 1963 रोजी लग्न केले. त्यानंतर प्रत्येक वर्षी सय्यद भेट रूपात अनिसाबाबत आपले प्रेम व्यक्त करतात. त्यांची पुढची पिढीही अशाच प्रेमाची जपणूक करत आहे. त्यामुळे कादरी कुटुंबासाठी व्हॅलेंटाइन डे कालही होता, आजही आहे आणि उद्याही असेल..!"

प्रेम, असेच असते. काळापलीकडचे, जाती-धर्मापलीकडचे, नात्यापलीकडचे.. प्रेम, कुणीही कुणावरही करण्याचे.. प्रेम, लक्षण जिवंतपणाचे.. प्रेम, नाव नि:स्वार्थ देण्याचे.. प्रेम, असेच असते. बंधनापलीकडचे, भेटवस्तूंपलीकडचे, एका दिवसापलीकडचे.. तरीही प्रेम व्यक्त व्हायला हवे. निमित्त व्हॅलेंटाइनचे असो वा नसो. मात्र 72 वर्षांच्या सय्यद मुश्ताक कादरी यांच्यासाठी व्हॅलेंटाइन हा खास दिवस. त्यांना अनिसा आजही ‘हसीं’ वाटतात तर ते स्वत: जवां. त्यामुळे ते 14 फेब्रुवारीला आपल्या पत्नीविषयीचे प्रेम भेटवस्तूच्या रूपात गेली पन्नास वर्षे व्यक्त करत आहेत. आजची त्यांची भेट शब्दरूपात..

पचास साल पहले मुझे तुमसे प्यार था,
आज भी है और कल भी रहेगा.


माझ्या पत्नीविषयीच्या या भावना आहेत आणि मला वाटतं भावना व्यक्त व्हायला हव्यात. खरं तर मी राजकारण्याचा मुलगा. माझे वडील सय्यद अली सय्यद हे 1967 ते 1971 या काळात जळगावे खासदार होते. त्यांनी आपले आयुष्य समाजासाठी वाहिले. त्यांच्या सहवासात माझाही विकास झाला. मुंबई विद्यापीठातून बी. ए. गोल्ड मेडल मिळवत पास केले. त्यानंतर आरबीआयमध्ये आणि पुढे स्पर्धा परीक्षा पास करून विक्रीकर अधिकारी म्हणून नोकरी केली. नोकरी आणि त्यातून येणारे काम करत असतानाच समाजकार्यावर प्रेम जडले. खरं तर प्रेम आणि त्याचे प्रतीक व्हॅलेंटाइन डे हे आमच्या संपूर्ण कुटुंबाचेच प्रतीक बनले आहे. ते कसे हे पुढे कळेलच..

.. आणि लग्न पुढे ढकलले : माझे वडील खासदार होते, तर अनिसा यांचे वडील वकील होते. दोघे चांगले मित्र होते. त्यामुळे त्यांचे घरच्यासारखे संबंध होते. या संबंधाचे रूपांतर नात्यात करण्याचे ठरले.
आमचा साखरपुडा मार्च महिन्यात झाला. मात्र, आमच्या दोघांच्या वडिलांचा आग्रह होता की, लग्न 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी व्हावे. हा विचार सर्वांनीच उचलून धरला. त्यामुळे वर्षभरानंतर 14 फेब्रुवारी 1963 रोजी आम्ही विवाहबंधनात म्हणा की प्रेमबंधनात बांधले गेलो. पण कहाणी इतक्यावर थांबत नाही. अनिसा यांचे बंधू एस. एम. काझी कलेक्टर होते. सय्यद यांच्या बहिणीशी त्यांचा विवाह ठरला होता. त्यांचाही विवाह याच दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला झाला. त्यामुळे प्रेम आणि त्याचे प्रतीक व्हॅलेंटाइन डे हे आमच्या संपूर्ण कुटुंबाचेच ‘प्रतीक’ बनले आहे.

प्रेम व्यक्त व्हायला हवे
माझे माझ्या पत्नीवर खूप प्रेम. ते तिलाही नक्कीच माहीत आहे. पण त्यामुळे तसे गृहीत धरून कसे चालणार? प्रेम व्यक्त होत राहिलं तर त्यात जिवंतपणा राहतो. त्यामुळे मी लग्नापासूनचा प्रत्येक व्हॅलेंटाइन डे विशेष करण्याचा प्रयत्न करतो. भेट देऊन आवर्जून ते व्यक्त करतो. सुरुवातीला अनिसाला सोन्याची अंगठी देत होतो. दहा अंगठय़ा झाल्यानंतर गिफ्ट बदलले. त्यानंतर कानातले दागिने, पैठणी साड्या आणि इतर वस्तू माझ्या प्रेमाचे प्रतीक ठरल्या. आज लग्नाला 50 वर्षे झालीत; पण वाटते, ‘मानो, बस कल की बात हो ’..

कुटुंबाचा आधार
माझा खूप वेळ समाजसेवेत जात असे. बाहेरगावी फिरणे असायचे. त्यामुळे पत्नीने संपूर्ण कुटुंबाची म्हणजेच आमच्या तीन मुली आणि एका मुलाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. ती आधी शिक्षिका राहिल्याचा फायदा झाला. त्यामुळेच आलेहा कादरी, सल्मा कादरी, रुबिहा सईद या मुली आणि जुल्फिकार कादरी हा मुलगा, असे तिघेही एक जबाबदार व्यक्ती होऊ शकले आहेत. त्यामुळे तिने मला पावलोपावली साथ दिली. तिच्याशिवाय जीवन अर्धवट आहे. त्यामुळे तू तिथे मी, हेच खरे.

तुझी कायम सोबत हवी
>मी तिला लग्नानंतर प्रत्येक व्हॅलेंटाइन डेला गिफ्ट देतो. तिने मला कधी गिफ्ट दिले नाही. मात्र, तिच्या हातचा स्वयंपाक माझ्यासाठी गिफ्टपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. तिने केलेली बिर्याणी, गुलाबजामून आवडीने खातो. आयुष्यात तिची साथ माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तिच्यासाठी या चार ओळी ..

"सगळ्यांपेक्षा वेगळी तू नक्कीच आहेस.पाण्याहुनी खळखळून तुझे हसणे आहे
फुलापेक्षाही नाजूक तुझे बोलणे आहे स्वप्नापेक्षाही सुंदर तुझे दिसणे आहे.
पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्यासोबत असणे आहे."

- सय्यद मुश्ताक कादरी


गिफ्ट सांभाळून ठेवलेत..
>व्हॅलेंटाइन डे आमच्यासाठी एका सणासारखा आहे. हे मला दरवर्षी काहीना काही गिफ्ट देतात. आजही मी ते गिफ्ट सांभाळून ठेवले आहेत. सर्व मुले मुली आणि नातेवाईक मिळून हा दिवस मोठय़ा उत्साहाने साजरा करतो. कधी कधी आम्ही बाहेरगावी जाऊन साजरा करतो.
-अनिसा कादरी