आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीचा अतिदक्षता विभाग (एमआयसीयू) अखेर स्थलांतरित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (घाटी) अतिदक्षता विभाग (एमआयसीयू) नव्या मेडिसीन बिल्डिंगमध्ये बुधवारी (29 जानेवारी) एकदाचा स्थलांतरित झाला. मेडिसीन बिल्डिंगचे उद्घाटन झाल्यानंतर पावणेदोन वर्षानंतर हा विभाग स्थलांतरित झाला आहे. स्थलांतर रखडल्यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले होते; तसेच या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा केला होता.
घाटीमध्ये 22 जानेवारी रोजी झालेल्या ‘इरकॉन’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ‘एमआयसीयू’चे लोकार्पण झाले. मात्र सर्व वैद्यकीय साहित्य, उपकरणे आणि अत्यवस्थ रुग्णांना नव्या ठिकाणी काळजीपूर्वक हलवण्यासाठी 29 जानेवारीची सायंकाळ उजाडली. नवीन जागेतील ‘एमआयसीयू’ अतिशय प्रशस्त, टापटीप तसेच अद्ययावत झाला आहे. संपूर्ण विभागासाठी असलेली मोठी जागा, ही या विभागाची जमेची बाजू आहे.
मेडिसीन बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर उजव्या बाजूला नवीन ‘एमआयसीयू’ असून गर्दी रोखण्यासाठी आणि जंतुसंसर्ग न होण्याच्या दृष्टिकोनातून लोखंडी गेटही नुकतेच बसवण्यात आले आहे. या संदर्भात प्रभारी विभागप्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. गजानन सुरवाडे ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले, नवीन ठिकाणी ‘एमआयसीयू’ अधिक सुसज्ज झाला असून, अत्याधुनिक सुविधा रुग्णांना मिळणार आहेत.
तर दुप्पट रुग्णांना मिळेल लाभ : जुन्या जागेतील ‘एमआयसीयू’मध्ये 14 अत्यवस्थ रुग्णांना दाखल करता येत होते. त्यासाठी स्वतंत्र 14 व्हेंटिलेटर या विभागासाठी आहेत. नवीन जागेमध्ये व्हेंटिलेटरच्या सोयीसह 17 अत्यवस्थ रुग्णांना दाखल करता येईल. तसेच याच ठिकाणी असलेल्या ‘स्टेप टू आयसीयू’मध्ये व्हेंटिलेटरची गरज नसणार्‍या; परंतु निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक असणार्‍या 9 ते 10 गंभीर रुग्णांना दाखल करता येईल. अशा एकूण 27 अत्यवस्थ, गंभीर रुग्णांना नव्या ‘एमआयसीयू’चा लाभ मिळेल. अर्थात, त्यासाठी प्रशासनाकडून आणखी तीन व्हेंटिलेटर, तसेच किमान चार जास्तीचे चतुर्थ र्शेणी कर्मचारी, किमान दोन जास्तीचे हाऊस ऑफिसर व दोन जास्तीच्या परिचारिका मिळणे आवश्यक आहेत. सद्य:स्थितीत 14 अत्यवस्थ रुग्णांना दाखल केले जाईल, असे बाहेरगावी असलेल्या विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी ‘दिव्य मराठी’ला फोनवर सांगितले.