आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Various Aspect Of Dr.Babasaheb Ambedkar Disclosing Through Decumentary

माहितीपटातून समोर येणार डॉ बाबासाहेब आंबेडकरांची विविध पैलू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एमजीएमच्या नाट्यशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक रमाकांत भालेराव हे रंगमंचावरून डॉ.बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. दहावी उत्तीर्ण झाल्यावर भालेराव महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मिलिंद महाविद्यालयात गेले. लहानपणापासून बाबासाहेबांच्या विचारांनी भारावलेल्या भालेराव यांनी या महाविद्यालयात त्यांची अनेक छायाचित्रे बघितली. त्यात बाबासाहेब स्वत: काम करत असलेले एक छायाचित्र होते. एवढा मोठा माणून सामान्य माणसाप्रमाणे काम करीत असल्याचे बघून भालेराव चकित झाले. येथूनच बाबासाहेबांचे पूर्ण चरित्र समजून घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला. एवढेच नव्हे, तर ज्या ज्या माणसाकडे बाबासाहेबांची चित्ररूपी जी जी आठवण आहे ती कॅमेर्‍यात कैद करण्याचा निश्चयही याच वेळी त्यांनी केला.

बाबासाहेबांच्या दुर्मिळ फोटोंचा शोध

भालेराव यांनी वयाच्या 17 व्या वर्षापासून बाबासाहेबांची छायाचित्रे जमा करण्यास सुरुवात केली. भालेराव यांचे आजोबा दामोदर कांबळे छावणी येथील गड्डीगुडम येथे राहत होते. बाबासाहेब जेव्हा औरंगाबादेत येत तेव्हा ते त्यांची सेवा करायचे, असे त्यांना कळले. मग सुरुवात झाली ती आजोबा कांबळे यांच्यापासून. दुर्दैवाने आजोबांचे बाबासाहेबांसोबत असलेले एकुलते एक छायाचित्र खराब अवस्थेत त्यांच्या हाती लागले, परंतु इतर छायाचित्रे मात्र त्यांना आजोबांकडून मिळाली. हाच ध्यास घेत भालेराव यांनी बाबासाहेब हयात असताना जी जुनी मंडळी होती त्यांचा शोध घेतला आणि आपली शोधमोहीम सुरू केली. या काळात शेकडो छायाचित्र जमवण्यात भालेराव यशस्वी ठरले.

मित्रांचा मोलाचा वाटा
भालेराव जेव्हा आपल्या नवीन मित्रांना भेटत तेव्हा सर्वात आधी बाबासाहेबांचे फोटो आहेत का? असा प्रश्न करीत असत. या काळात महेंद्र खिल्लारे नावाच्या आपल्या एका मित्राच्या विनंतीवरून भालेराव यांनी बीड येथे नाटकाचा प्रयोग केला. तेव्हा खिल्लारे यांनी मानधन किती द्यायचे, असा प्रश्न केला. भालेराव यांनी मानधन घेण्यास नकार दिला. द्यायचेच असेल तर बाबासाहेबांचे दुर्मिळ छायाचित्र दे, असे ते म्हणाले. मग खिल्लारे यांनी दुसर्‍या दिवशी बाबासाहेबांचे एक छायाचित्र भालेराव यांना दिले. अशा प्रकारे भालेराव हे मित्र जोडत गेले आणि त्यातूनच त्यांच्याकडे डॉ. आंबेडकरांच्या छायाचित्रांचा खजिना जमा होत गेला.

यांच्याकडून मिळाली छायाचित्र
प्रा. भालेराव यांना अनेक मित्रांकडून व परिचितांकडून बाबासाहेबांची दुर्मिळ छायाचित्रे मिळाली. त्यात रिपब्लिकन टायगर फोर्सचे विजयकुमार खंडागळे, अँड. सचिन थोरात, धम्मजित म्हस्के, राजू भालेराव, रवी जाधव, प्रदीप वाकेकर, राहुल म्हस्के आणि नंदू भुरे यांचा मोलाचा वाटा आहे.

छायाचित्रांचे कॅलेंडर बनवणार
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व छायाचिंत्राचा खजिना प्रत्येक आंबेडकरी विचाराच्या व्यक्तीच्या घरात पोहोचवण्याचा आपला ध्यास असून संपूर्ण छायाचित्रांचे एक कॅलेंडर तयार करण्याचा भालेराव यांचा मानस आहे. कुठलेही अतिरिक्त शुल्क न आकारता जितका खर्च होणार तितकेच पैसे घेऊन हे कॅलेंडर घराघरात पोहोचवणार असल्याचेही ते म्हणतात.

17 मिनिटांची डॉक्युमेंट्री
ही दुर्मिळ छायाचित्रे पाहून प्रा. भालेराव यांना त्यांचे एक मित्र विजयकुमार खंडागळे यांनी एक माहितीपट तयार करण्याची सूचना केली. त्यानंतर प्रा. भालेराव, खंडागळे आणि महेंद्र खिल्लारे या तिघांनी बसून उपलब्ध छायाचित्रांचा वापर करून बाबासाहेबांच्या जीवनपट उलगडणारा 17 मिनिटांचा माहितीपट तयार केला. मराठवाड्यातील प्रत्येक गावात तो दाखवण्याचा उपक्रमही भालेराव यांनी राबवला आहे. माझ्या संग्रहातील ही सर्व छायाचित्रे माहितीपटात बोलू लागतात, असेही ते आनंदाने सांगतात.

काय आहे माहितीपटात
या माहितीपटात बाबासाहेबांचे तारुण्यापासून ते महानिर्वाणापर्यंतची अनेक छायाचित्रे पाहायला मिळतात. बाबासाहेबांनी व्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा, सामान्यांसाठी खाल्लेल्या खस्ता, पर्शिम याची माहिती यातून मिळते. याशिवाय बाबासाहेबांचे विचार घेऊन जे मोठे झाले आणि ज्यांनी स्वत:च्या स्वार्थापोटी बाबासाहेबांचे विचार कसे पायदळी तुडवले, याचाही उल्लेख त्यांच्या या माहितीपटात आवर्जून पाहायला मिळतो. शिवाय वामनदादांचे पट्टशिष्य शाहीर विजयआनंद जाधव यांच्या विद्रोही गाण्याचा समावेश यात आहे. माहितीपटात स्वत: भालेराव यांनी निवेदन केले आहे.
300 पत्रांचा खजिनाही
छायाचित्रांबरोबरच बाबासाहेबांच्या हस्तलिखित पत्रांचाही खजिना भालेराव यांनी जमवला आहे. बाबासाहेबांनी स्वत: लिहिलेल्या सुमारे 300 पत्रांची छायाचित्रे त्यांच्याकडे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात नाटकांचे प्रयोग करीत असताना फोटोसह बाबासाहेबांचे पत्र कुणाकडे आहे का हे शोधणे आणि त्यांची छायाचित्रे घेणे हा भालेराव यांचा जीवनक्रम झाला आहे. या पत्रांचे वैशिष्ट्य असे की, भल्याभल्यांची हे पत्र वाचताना भंबेरी उडते. अशी दुर्मिळ लिखाणशैली बाबासाहेबांच्या पत्रात बघायला मिळते.
..आणि अर्श्रूंचा बांध फुटला
14 एप्रिल 2011 रोजी हा माहितीपट औरंगाबादेतील क्रांती चौकात प्रोजेक्टरच्या साहाय्याने दाखवण्यात आला. जेव्हा मिरवणूक डीजेच्या ठेक्यावर माहितीपटापर्यंत यायची तेव्हा डीजेचा आवाज कमी होत होता व मिरवणुकीतील सगळे लोक माहितीपटात गुंगून जायचे. मिरवणुकीत आलेला प्रत्येक जण हा माहितीपट बघितल्याशिवाय पुढे जात नव्हता. या वेळी लोक जेव्हा बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार होतानाचे दृश्य पाहायचे तेव्हा सार्‍यांच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहायला लागायचे.
मित्रांमुळे प्रोत्साहन मिळाले
बाबासाहेबांना देव मानणारे कोट्यवधी अनुयायी आहेत. त्यांपैकी मी एक. बाबासाहेबांची विचारधारा व त्यांचे काम प्रत्येक आंबेडकरी अनुयायापर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे.छायाचित्र, माहितीपटाच्या माध्यमातून समविचारी मित्रांना सोबत घेऊन मी हे काम हाती घेतले आहे. त्यांच्यामुळेच मला प्रोत्साहन मिळाले.
प्रा. रमाकांत भालेराव, नाट्यशास्त्र विभाग, एमजीएम

पुढील स्लाइडमध्‍ये पाहा डॉ आंबेडकरांची काही दुर्मिळ छायाचित्रे ...............................