आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंदेरी जग: अनेक चित्रपटांच्या सेटला लागले सिल्लोडच्या गफूर पटेल यांचे हात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुंबईच्या चित्रपटनगरीत 25 पेक्षा अधिक बिग बजेटच्या चित्रपटांचे सेट सिल्लोड येथील गफूर पटेल यांनी केले आहे. त्यांनी सारजहां येथील मॉल आणि पंचतारांकित हॉटेलच्या मोल्डिंगचे काम केले आहे. सध्या ते शहरालगत असलेल्या शहर सावंगीत आपला व्यवसाय करत आहेत.

शेख गफूर पटेल मूळचे अंधारी (ता. सिल्लोड) येथील आहेत. त्यांना 1968 मध्ये अहमद कुरेशी नावाच्या व्यक्तीने मुंबईत नेले. कुरेशी चित्रपटनगरीत मांस मच्छी पुरवण्याचे कंत्राट घेत असत. त्यांच्या हाताखाली गफूरभाई काम करत. आर. के. स्टुडिओमध्ये कामगारांसाठी मटण घेऊन जात असत.

दरम्यान, सेट तयार करण्याचे काम करणार्‍या कारागिरांजवळ ते तासन्तास बसत. हळूहळू त्यांनी देखील सेट तयार करण्याची कला अवगत केली आणि बघता बघता ते एक उत्कृष्ट कारागीर म्हणून पुढे आले.

चार रुपये रोजंदारीवर काम करणार्‍या गफूरभाई यांनी 1970 च्या दशकात प्रमोद चक्रवर्ती यांच्या ‘नया जमाना’ या चित्रपटाचा सेट तयार केला. वाय. बी. फडके यांनी कंत्राट घेतले होते. गफूरभाई यांचे काम पाहून त्यांनी संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यानंतर ते सेटच्या दुनियेत त्यांचे नाव चांगलेच गाजू लागले.

फिल्म सिटी, एसएल, नटराज आणि महेबूब, आर. के. आदी स्टुडिओंमध्ये त्यांनी बॉबी, प्रेमरोग, क्रांती, आशिक हूं बहारों का, जंजीर, रझिया सुल्तान, आली बाबा चाळीस चोर आदींसह 25 पेक्षा अधिक चित्रपटांचे सेट तयार केले. त्यांच्या कलेवर मोहीत होऊन एका नामांकित कंपनीच्या कंत्राटदाराच्या माध्यमातून ते 1982 मध्ये सारजहां येथे गेले. त्यांना सारजहांमध्ये बोहरी समाजाची मशीद, पंचतारांकित हॉटेल आणि मॉलची सिलिंग आणि मोल्डिंगचे काम केले. दोन वर्षे सारजहांत राहिल्यानंतर ते मायदेशी परत आले. त्यांनी स्वत: व्यवसाय करण्याचे ठरवले.