आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणूक: प्रचारासाठी नऊ प्रकारच्या परवानग्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. यात महत्त्वाच्या पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले गेले नाहीत. अपक्ष आणि इतर लहान-मोठ्या पक्षांच्या उमेदवारांनी अर्जही दाखल केले आहेत. मात्र, या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी अगोदर नऊ प्रकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. ज्यांच्याकडे ही परवानगी आढळणार नाही अशांवर थेट आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यात तात्पुरत्या तयार करण्यात येणा-या प्रचार कार्यालयासाठीही परवानगी घ्यावी लागणार आहे.

असे आहेत परवाने
१. चौक सभा व सर्व जाहीर सभा- यासाठी संबंधित पोलिस स्टेशनची परवानगी लागेल. यासाठी अर्ज, खासगी जागामालकाचे संमतिपत्र, मनपाचे ना हरकत प्रमाणपत्र, सभास्थळ, वेळ आदींची माहिती अगोदर द्यावी लागेल.

२. पोस्टर्स, झेंडे - सभेच्या ठिकाणी हे लावण्यासाठी मनपाच्या मालमत्ता अधिका-याची परवानगी लागेल. अर्जासह केवळ खासगी जागामालकाचे संमतिपत्र आवश्यक.

३. फलक, जाहिरात लावणे - मनपा मालमत्ता अधिका-याची परवानगी लागेल. खासगी जागा असल्यास मालकाचे संमतिपत्र आवश्यक. जो मजकूर अथवा फोटो असतील त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिका-यांना देणे आवश्यक आहे.

४. वाहन रॅली - संबंधित निवडणूक निर्णय अधिका-यांची परवानगी लागेल. तसेच उमेदवारांना केवळ त्यांच्याच मतदारसंघात ही रॅली काढता येईल. त्यात सहभागी वाहन मालकाचे संमतिपत्र, वाहन नोंदणीपत्र, वाहनचालक परवाना लागेल.

५. तात्पुरते प्रचार कार्यालय - पोलिस प्रशासन व निवडणूक निर्णय अधिकारी यांची यासाठी परवानगी लागणार आहे. यासाठी अर्जासह जागामालकाचे संमतिपत्र, मनपाचे ना हरकत प्रमाणपत्र लागेल.

६. हेलिपॅड, हेलिकॉप्टर उतरवणे - संचालक नागरी विमानसेवा प्राधिकरणाची परवानगी लागेल. अर्जासह जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांचे ना हरकत प्रमाणपत्र. मनपाकड भरलेल्या शुल्काची पावती व ना हरकत प्रमाणपत्र लागेल.

७. केबल जाहिरात - निवडणूक निर्णय अधिका-यांची परवानगी लागणार आहे. यात नमुना अ मध्ये अर्ज करून दृक-श्राव्य जाहिरातीची सीडी संबंधित निवडणूक अधिका-यांना देणे आवश्यक. तसेच त्याच्या खर्चाच्या धनादेशाची पत्रे सोबत जोडणे आवश्यक. जिल्हाधिकारी व मनपाचे ना हरकत प्रमाणपत्र, करमणूक शुल्क भरल्याची पावती.

८. ध्वनिक्षेप - पोलिस प्रशासनाची परवानगी आवश्यक. त्यासाठी अर्ज, पोलिस ना हरकत प्रमाणपत्र, करण्यात येणा-या वाक्याची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिका-यांना देणे आवश्यक राहील.

९. मिरवणूक, रोड शो - यासाठी पोलिस प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी अर्ज, पोलिस स्टेशनचे ना हरकत प्रमाणपत्र, स्थळ, मर्यादा, वेळ याची माहिती निवडणूक निर्णय अधिका-यांनाही देणे अनिवार्य आहे.